प्रतापकाका ढाकणेंच्या हस्ते स्वतःच्या गावांत खा. विखे पा., आ. राजळेंचा सत्कार ; घटनेचे राजकीय विश्लेषणे सुरू !
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी :- भाजपच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते ॲड. प्रतापकाका ढाकणे यांची अचानक एन्ट्री होताच काही सेकंद व्यासपीठावर तणाव पसरला. मात्र ढाकणे यांनी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांचा ग्रामस्थांच्या वतीने केलेला सन्मान उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला. क्षणार्धात तणाव निवळून सर्व मान्यवरांनी जागेवर उभे राहत ढाकणे यांचे विषयी आदर व्यक्त केला. मात्र ढाकणेंची ही गुगली पाथर्डी शेवगाव मतदारसंघासह जिल्ह्यात याविषयाचे चांगलेच राजकीय फवारे उडले असल्याने भाविष्यात येणाऱ्या लोकसभेच्या अनुषंगाने ॲड प्रतापकाका ढाकणे व खा.सुजय विखे पा., या दोन्ही नेत्याविषयी चर्चा चांगलीच रंगली आहे.
पाथर्डी तालुक्यातील अकोले गावचे स्व. बबनराव ढाकणे सुपूत्र. देशव्यापी कर्तुत्वाने अकोले गावची ओळख त्यांनी देशाला दिली. ढाकणेंचे अकोले किंवा ढाकण्यांची पाथर्डी अशी ओळख ही तालुक्याकडून काही काळ दिली गेली. शनिवारी गावात खासदार, आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगलेला होता. आमदार मोनिकाताई राजळे यांचे भाषण सुरू असताना अत्यंत दमदारपणे व्यासपीठावर ॲड. प्रताप ढाकणेंची एन्ट्री झाली. यावेळी आमदार मोनिकाताई राजळेंनी आपले भाषण थांबवले. सर्वजण सावध होत असतानाच थेट खा.श्री विखेंकडे जात त्यांनी त्यांचा व त्यानंतर आमदार मोनिकाताई राजळे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमानंतर बोलताना ढाकणे म्हणाले, स्व. लोकनेते बाळासाहेब विखे पा. व स्व. बबनराव ढाकणे यांनी नगर दक्षिणेत विकास कामांसाठी सहमती एक्सप्रेस चालवली. संघर्षाचा दोन्ही कुटुंबाचा वारसा असून गेल्या चार दशकांहून अधिक काळ दोन्ही कुटुंबाचे स्नेहाचे संबंध आहेत. खासदार डॉ. विखे यांचे आमच्या गावात प्रथमच आगमन झाले. शिष्टाचाराची परंपरा पाळत स्वागताचा भाग म्हणून गावाच्या वतीने आपण त्यांचे स्वागत केले. यापूर्वी स्व.बबनराव ढाकणेंनी सुद्धा दुष्काळाच्या काळी स्व. बाळासाहेब विखे यांचे स्वागत केले होते. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या या भागात नेहमीच येणे जाणे असते. सत्कार करून गावासाठी काहीतरी भरीव करण्याची मागणी आपण केली. सध्या माझे दौरे सुरू आहेत. त्या भागातून येताना गावात कार्यक्रम सुरू असल्याचे कळाले. गावाच्या प्रथेप्रमाणे येऊन आपण त्यांचे स्वागत केले. याचा कोणताही राजकीय अर्थ लावू नये. राजधर्म वेगळा असला तरी ग्रामधर्माचे आपण पालन केले. असे श्री ढाकणे यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान श्री ढाकणे यांच्या गावकीच्या सत्काराने सत्कारमूर्ती सुद्धा काही क्षण बुचकळ्यात पडले. येत्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीशी असे संदर्भ जोडले जात आहेत. यापूर्वी ॲड. ढाकणेही भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. आजही भाजपच्या केंद्रीय नेत्यांपासून जिल्हा पातळीवरील नेत्यांबरोबर त्यांचे सोलोख्याचे संबंध आहेत. ॲड. ढाकणे यांची सुद्धा लोकसभेचे शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा आहे . दुसरे इच्छुक उमेदवार आमदार निलेश लंके यांनी तालुक्याचे दौरे वाढवले असले तरी ॲड. ढाकणे यांच्याशी त्यांचा सतत संपर्क नाही. शेवगाव तालुक्यात सर्वपक्षीय नेत्यांशी श्री खा.विखे यांची वाढलेली जवळीक पाहता अशा नेत्यांना श्री ढाकणे यांनी कृतीतून इशारा दिला आहे. श्री खा.विखे यांनी मात्र या सत्काराला शुभ कौल मानून सत्कार स्वीकारला. आमदार मोनिकाताई राजळे व ॲड. प्रतापकाका ढाकणे यांच्यामधील राजकीय वैर कमी झाले असून परस्परांवरील वैयक्तिक टीका त्यांनी कमी केली आहे. श्री ढाकणे यांची राजकीय गुगली कोणाची व कशी विकेट घेते की, त्यांच्या गुगलीवर नेते षटकार ठोकतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नगर लोकसभा मतदार संघासह शेवगाव पाथर्डी विधानसभेचे राजकीय सामने” साखर पेरणीतून ” होणार असे चित्र आता स्पष्ट होत आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, ज्येष्ठ नेते काशिनाथ लवांडे व माजी सरपंच संजय बडे, धनंजय बडे, सरपंच नारायण पालवे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.