संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
जालना ः जालन्यातील परतूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मराठ्यांची मते कांड्यावर (बोटावर) मोजण्याइतकी आहेत, असं विधान एका बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालं असून लोणीकर यांच्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील हेही लोणीकर यांच्यावर चिडल्याचं पाहायला मिळालं.
आष्टी गावात अठरा पगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची मते कांड्यावर (बोटावर) मोजण्याइतकी आहेत. पण, हे सर्व समाजाचे गाव आहे. मराठा, धनगर, माळी, फुलारी धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत, असं लोणीकर म्हणताना व्हिडिओत दिसत आहेत.
जरांगे-पाटील काय म्हणाले?
हे विधान खेदजनक आहे. या नेत्यांच्या अशा वागण्याने मराठा समाज अडचणीत यायला लागला आहे. अशा लोकांना मराठा समाजाने थारा देऊ नये. त्यांना धडा शिकवला पाहिजे. त्याशिवाय ते जागेवर येणार नाहीत. त्यांना रस्त्यावर आणण्याची ताकद केवळ मराठा समाजात आहे, त्यांना समाज नक्कीच रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा संताप जरांगे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.
आधी लोणीकरांचं विधानानंतर सारवा-सारव
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोडतोड करून व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप करत लोणीकर यांनी करत सारवा-सारव केली. लोणीकर म्हणाले, आष्टी गावात मराठा समाजाची मते कमी आहेत, असं मी माझ्या भाषणात म्हटलं होतं. आष्टी गाव एससी, एसटी, मुस्लीम, अशा अठरापगड जातींचे आहे. या गावाने 40 वर्षे भाजपला मताधिक्य दिले आहे. मला मराठा समाजाची 60 ते 70 टक्के मते मिळतात. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी भाषणाची मोडतोड करून व्हिडिओ व्हायरल केला.