👉२० रुपये टक्के प्रतिमाहिना घेत होता व्याज; कर्जत पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कर्जत – ‘मी तुला दिलेली ४० हजारांची मुद्दल आणि त्या मुद्दलीचे ९६ हजार व्याज अशी १ लाख ३६ हजार रक्कम दे आणि मगच तुझी बुलेट घेऊन जा’ असे म्हणणाऱ्या कर्जत तालुक्यातील भांबोरे गावातील अव्वाच्या सव्वा वसुली करणाऱ्या एका खाजगी सावकारावर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खाजगी व छुप्या सावकारकी क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,फिर्यादी ‘सुरेंद्र रविंद्र काजळे व पत्नी (रा.तांदुळवाडी ता.बारामती) यांना डिसेंबर २०२० रोजी कोरोना संसर्ग झाला होता.उपचारासाठी पैशांची गरज असल्याने कोणाकडे पैसे मिळतील का? हे पहात असताना फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणचे संभाजी जाधव यांनी त्यांचे (भांबोरे ता.कर्जत) येथील नातेवाईक सचिन माने यांच्याशी फिर्यादीसोबत ओळख करून दिली होती.पैशांची गरज असल्याने सचिन माने यांनी फिर्यादीला १५ डिसेंबर २०२० रोजी ४० हजार रुपये महिन्याला २० रु टक्के व्याजदराने दिले होते.त्यानंतर फिर्यादीने दोन महिन्याचे १६ हजार रोख दिले होते.त्यानंतर ३१मार्च २०२१ रोजी चतुर्थीनिमित्त फिर्यादी बारामतीहून सिद्धटेक येथे गणपती दर्शनासाठी आले असता खाजगी सावकाराने फिर्यादीची रॉयल इन्फील्ड क्लासिक बुलेट (एम.एच ४२ ए व्ही ६००९) ही गाडी भांबोरे गावातून जात असताना सचिन माने याने त्याच्या चप्पलीच्या दुकानासमोर गाडी अडवली व म्हणाला ‘तू माझ्या पैशांचे काय केले? त्यावर फिर्यादीने एक महिन्याच्या आत पैसे देऊन टाकतो असे सांगितले. पण ‘मला तुझ्यावर विश्वास नाही तू माझे पैसे आणुन दे आणि मगच तुझी गाडी घेऊन जा’ असे म्हणत फिर्यादीकडुन गाडी हिसकावून घेतली.फिर्यादी यांनी बारामती येथील अक्षय अडागळे यास बोलावुन त्यांच्यासोबत घरी निघून गेले.त्यानंतर फिर्यादीकडे पैसे आल्यावर जुन २०२१ मध्ये फिर्यादीने ५० हजार रुपये आणले व ‘आता माझी गाडी मला दे’ अशी विनंती केली मात्र सावकाराने ‘अगोदर दिलेली ४० हजार रक्कम व त्यावर आत्तापर्यंत झालेले ९६ हजार व्याज असे एकूण १ लाख ३६ हजार दे आणि मगच बुलेट घेऊन जा’ असे सांगितले. त्यानंतरही पैशांची जमवा-जमव करून ५६ हजार देत असल्याबाबत फोन केला असता ‘मला १ लाख ३६ हजार दे आणि मगच गाडी घेऊन जा’ असे सांगितले.खाजगी सावकार सचिन माने याच्याकडे सावकरकीचा कोणताही परवाना नसल्याने सुरेंद्र काजळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, भगवान शिरसाठ, पोलीस अंमलदार मारुती काळे, मनोज लातूरकर,भाऊ काळे, गणेश भागडे यांनी केली आहे.
खाजगी सावकारकीची पाळेमुळेच होताहेत नष्ट!
कृतिशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी खाजगी सावकारकीचे उच्चाटन करण्यासाठी ‘सावकारकीवरून कुणी त्रास देत असेल तर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केलेले आहे.त्यामुळे अनेक सावकारांचे कंबरडे मोडले असुन त्यांनी व्याजात बळकावलेल्या अनेक जमिनीही शेतकऱ्यांना परत मिळाल्या आहेत.त्यामुळे खाजगी सावकारकीची पाळेमुळे आता हळूहळू नष्ट होऊ लागली आहेत.