संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- दारूची वाहतूक करणार्या वाहनांवर पाळत ठेवून पाठलाग करणे, वाहने अडवून लूटमार करणार्या सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात नगर गुन्हे शाखेस यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला. औरंगाबाद येथील चिखलठाणा एमआयडीसी येथून आयशर टेम्पोत विदेशी दारूचे बॉक्स भरून चालक अन्सार हसन पठाण हा 28 मे रोजी रात्रीच्या वेळेस औरंगाबादनगर रोडने कोल्हापूरकडे चालला होता. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, हवालदार मनोहर गोसावी, पोलिस नाईक सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोंढे, पो. कॉ. शिवाजी ढाकणे, हवालदार संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही केली आहे.
रात्री साडेअकराच्या सुमारास इमामपूर घाट येथे आले असता पाठीमागून कारमधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी टेम्पोला कार आडवी लावली. टेम्पो अडवून चालक व वाहक यांना खाली ओढून मारहाण करण्यात आली. छर्यांच्या बंदुकीचा धाक दाखवून दारूचा टेम्पो घेऊन पळ काढला. चालक पठाण याने नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. चोरीस गेलेल्या टेम्पोस असलेल्या जीपीएस प्रणालीवरून टेम्पोचे लोकेशन घेतले असता टेम्पो हा नगर-मनमाड रस्त्याच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग केला असता चिचोंली फाटा येथे टेम्पो सोडून आरोपींनी पळ काढला.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना आरोपीबाबत माहिती मिळाली.
पोलिसांनी स्वप्निल उर्फ भूषण सुनील गोसावी (वय 21 मूळ रा. ऐश्वर्या देवी मंदिराजवळ, सिन्नर रोड, जि. नाशिक, हल्ली राहणार नामपूर, ता. सटाणा, जि. नाशिक) यास नामपूर येथून ताब्यात घेतले.
त्याने साथीदारांची नावे सांगितल्यानंतर संतोष उर्फ बापू पंडित (वय 21 रा. नामपूर, ता. सटाणा जि. नाशिक), कुलदीप उर्फ गणेश मनोहर कापसे (वय 38 रा, अश्वमेध कॉलनी, आरटीओ ऑफिसजवळ, नाशिक), भारत सीताराम सुतार (वय 36 रा. टाऊनशीप, आंबेडकरनगर, ओझर, ता. निफाड, जि. नाशिक) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून वाहनाचा क्लिनर अमोल काळे याचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. यातील अटक करण्यात आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरोधात यापूर्वी जबरी चोरी, घरफोडी यासारखे विविध गुन्हे नाशिक जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात दाखल आहेत.