समृद्धी महामार्ग, कोकण सागरी महामार्ग व एक्स्प्रेस वे आणि वांद्रे वर्सोवा सीलिंक प्रकल्पांचा आढावा



👉समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास गती द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास आणखी गती देण्यात यावी. महामार्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्याबाबत तातडीने पावले उचण्यात यावीत. महामार्गाचा हा टप्पा लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज दिले.
मुंबई- नागपूर यांना जोडणारा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सीलिंक यासह प्रस्तावित कोकण सागरी महामार्ग व कोकण एक्स्प्रेस वे या प्रकल्पांचा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज आढावा घेतला. वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव (बांधकामे) अनिल गायकवाड, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी प्रकल्पांच्या माहितींचे सादरीकरण केले.
नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे 72 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे वेगाने पूर्ण करण्यात यावीत. या मार्गाच्या परिसरात पेट्रोलपंप, वाहनचालकांसाठीच्या सुविधा निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केल्या. तसेच इतर टप्प्यांची कामेही वेगाने पूर्ण करण्यात यावे. या कामांचा ऑगस्टमध्ये पुन्हा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कोकण सागरी किनारा महामार्ग हा कोकणासाठी महत्त्वपूर्ण मार्ग आहे. हा महामार्ग चार पदरी करावा. त्यामुळे वाहतूक सुरक्षित होईल व पर्यटक वाढीसाठीही उपयोग होईल. त्याचप्रमाणे या महामार्गावरील खाडींवरील सर्व पुलांचे काम प्राधान्याने हाती घेण्यात यावेत. भूसंपादनाची कमीत कमी गरज भासेल, अशा प्रकारे कामाचे नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
मुंबईतील वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. हे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कोकण द्रुतगती मार्गाच्या आरेखनाचा सविस्तर आढावाही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी घेतला. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या दळण-वळण, पर्यटन तसेच पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महत्वपूर्ण भर पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन झाल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. या महामार्गावर प्रवाशांसाठी सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण करण्यात येईल. समृद्धी महामार्गाच्या ठाणे व नाशिक भागातील कामेही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दोन्ही बाजूने वनीकरण करण्यात यावे. या महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रे कमी करून हा मार्ग अपघात विरहित असावा, यासाठीच्या उपाययोजना कराव्यात.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!