संघर्षयोद्धा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणेंचे निधन

 संघर्षयोद्धे, शेतकरी, उसतोड कामगारांचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणेंचे निधन
पाथर्डी येथे आज दिवसभर अंत्यदर्शन, उद्या पागोरी पिंपळगाव येथे दुपारी अंत्यविधी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork पाथर्डी : संघर्षयोद्धे, शेतकरी, उसतोड कामगारांचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्यावर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन आठवड्यांपासून ते न्यूमोनिया आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील साईदीप रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावली आणि गुरूवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाल्याची माहिती या खासगी रूग्णालयाचे प्रमुख डॉ. एस. एस. दीपक यांनी प्रसारमाध्यमांना दिली. बबनराव ढाकणे यांचे पार्थिव पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये  उद्या शनिवारी (दि.२८) दुपारी १ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी २ वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा प्रतापराव ढाकणे, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील एक संघर्षशील नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असून, नगर जिल्ह्यात शोक व्यक्त होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

बबनराव ढाकणे यांचा जन्म १० नोव्हेंबर १९३७ मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलातर्पेâ ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे हे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ऊर्जा संसाधनमंत्री होते. ते विद्यार्थीदशेपासूनच समाजकारणात सक्रिय होते. त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहातही सहभाग घेतला होता. गेल्यावर्षीच त्यांच्या जीवन कार्यावरील ‘महाराष्ट्र विधान मंडळातील बबनराव ढाकणे’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. या कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी बबनराव ढाकणे यांनी केलेले भावनिक भाषणही चांगलेच गाजले होते. ऊसतोडणी कामगारांचे नेते म्हणून बबनराव ढाकणे परिचित होते. तीनवेळा विधानसभा सदस्य, एकवेळ विधान परिषद सदस्य, एक वेळ खासदार व त्याचवेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्रीपद भूषवलेले बबनराव ढाकणे परिवारात व ऊसतोडणी विश्वात ‘साहेब’ म्हणून परिचित होते. पाथर्डी तालुक्यातील अकोले सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदापासून थेट केंद्रीय मंत्रीपदापर्यंत त्यांनी झेप घेतली होती. संघर्षयोद्धा म्हणून ते ओळखले जात असत. त्यांच्या निधनानंतर भावना व्यक्त करताना त्यांचे चिरंजीव अ‍ॅड. प्रतापकाका ढाकणे म्हणाले, ते माझे वडील होते, पण त्यापेक्षा जास्त माझे ते गुरू होते. मला घडवून माझ्यात संघर्ष रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या जाण्याने मी पोरका झालो आहे. बबनराव ढाकणे यांनी विद्यार्थीदशेतच थेट दिल्लीला जाऊन तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची १९५१ मध्ये भेट घेतली होती. हे त्यांच्या आयुष्यातील पहिले आंदोलन ठरले. गोवामुक्ती सत्याग्रहात त्यांनी सहभाग घेतला. तसेच पाथर्डी तालुक्यातील विकासाबाबत विधानसभेत जाऊन पत्रके भिरकावली होती. बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा असा त्यांचा यशाचा टप्पा राहिला. महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री, जनता पक्षाचे अध्यक्ष अशा जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री होते. जनता दल, जनता पार्टी, पुन्हा काँग्रेस, शेतकरी विचार दल व राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांमध्ये त्यांनी काम केले. उसतोडणी कामगार, शेतकरी, बेरोजगारी अशा विविध विषयांना त्यांनी अत्यंत आक्रमकपणे हात घातला. दिवंगत ढाकणे यांना पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, व्ही. पी. सिंग अशा मोठ्या नेत्यांचा सहवास लाभला होता. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचा पुतळाही त्यांनी पाथर्डीत उभा केला.

शनिवारी होणार अंत्यसंस्कार दिवंगत बबनराव ढाकणे यांचे पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी पाथर्डी येथील हिंदसेवाच्या वसतिगृहामध्ये उद्या  शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी दुपारी २ वाजता पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!