(निलेश ढाकणे)
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव ः मागील वर्षभरापासून शेवगाव तालुक्यातील शेअरबाजार गुंतवणूकदारांची राज्यभर चर्चा होती. लाखाला प्रति महिना 10 ते 20 हजारांच्या आसपास परतावा मिळतोय, म्हणून तालुक्यातील नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी,मजूरवर्गाने परताव्याच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात शेअर बाजार ट्रेडिंग करणार्या तरुणांकडे गुंतवणूक केली होती.
यापूर्वी ज्यांनी अशा प्रकारच्या काही प्रकरणात गुंतवणूक केली होती. ते लोक गुंतवणूक करणार्यांना सावधानतेचा इशारा देत होते. परंतु परताव्याच्या लोभापायी गुंतवणूकदारांनी या लोकांच्या इशाराकडे लक्ष दिले नाही. नोकरदार विशेषतः शिक्षक मंडळी ज्यांना आपण समाजाला दिशा दाखवणारा घटक म्हणून ओळखतो तेच, यामध्ये मोठ्या प्रमाणात बळी पडल्याचे दिसून येते. शिक्षक मंडळींनी शिक्षक बँक, राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन शेअर बाजार ट्रेडिंग करणार्या तरुणांकडे गुंतवणूक केली होती. पती-पत्नी शिक्षक असणार्या जोडप्यांची गुंतवणूक जवळपास 40 ते 50 लाखांच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे.
व्यावसायिक लोकांनी आपल्या व्यवसायापेक्षा इकडं जास्त नफा मिळतोय, म्हणून आपली संपूर्ण बचत व खेळते भाग भांडवल शेअर बाजार ट्रेडिंग करणार्या तरुणांकडे गुंतवून ठेवले. शेतकरी वर्गाने सुद्धा कापूस, ऊस, सोयाबीनचे आलेले पैसे आपला घरं खर्च भागवून उरलेली रक्कम शेअर बाजारात गुंतवून ठेवले. आता आपल्याला कशाचेही टेंन्शन नाही, आपल्याला सुद्धा महिन्याला पगार सुरू होईल या स्वप्नात हा गुंतवणूकदार वर्ग गुरफटून गेला. कोरोनाच्या वेळी सर्व कामकाज ठप्प झालेले असताना घरी बसून पैसे कमावण्याचे मार्ग शोधले गेले. त्यावेळी शेअर बाजार गुंतवणूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. शेवगाव तालुकाच नाही तर या कालावधीमध्ये देशभरातून सर्वाधिक डिमॅट खाते उघडले गेले.
शेवगाव तालुक्यातील काही तरुणांनी याच संधीचा फायदा घेऊन, आम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असून आमच्याकडे पैसे गुंतवले तर महिन्याला 10 हजार ते 20 हजार पर्यंत परतावा देऊ केला. सुरवातीला जवळच्या लोकांनी गुंतवणूकी केल्या त्यांना ठरल्याप्रमाणे परतावा मिळू लागला. ट्रेडिंग करणार्या तरुणांनी फाईवस्टार ऑफीस उघडली. महागाड्या गाड्या खरेदी केल्या. त्यांचे राहणीमान उंचावले.एवढ्या मोठ्या प्रमाणात परतावा मिळतोय म्हणून याविषयी मौखिक जाहिरात झाली आणि गुंतवणूकीचा ओघ वाढू लागला. हे चक्र मागील वर्षभरापासून जोरात सुरू होते. परंतु परिसरातील नवं गुंतवणूकदारांची संख्या घटू लागली, तसे परताव्याचे चक्र बंद पडू लागले. पुढच्या महिन्यात देऊ, 3 महिने थांबा, 5 महिने थांबा, मध्येच रक्कम हवी असल्यास 40 ते 50 टक्के कपात होईल, अशी कारण ट्रेडिंग करणार्या युवकांकडून दाखवण्यात येऊ लागली.
आता आपले पैसे जातात की, काय अशा विवंचनेत तालुक्यातील गुंतवणूकदार सापडलेला असतानाच, ट्रेडिंग करणारे युवक एकापाठोपाठ एक आपला बाडबिस्तरा आवरुन फरार होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. आता मात्र गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले होते.या प्रकरणात अनेक गुंतवणूकदारांनी आपल्याकडील रक्कम रोख स्वरूपात ट्रेडिंग करणार्या तरुणांना दिलेली आहे. काहींनी आपल्या खात्यातून ट्रान्स्फर केली आहे. मात्र गुंतवणूकदारांकडे ठोस पुरावे नाहीत. त्याबरोबर पैसे गेले तर गेले पण इज्जतीचा पंचनामा नको, म्हणून बरेचसे गुंतवणूकदार झाकली मूठ सव्वा लाखाची असे म्हणून कानाला चिमटा घेतांना दिसत आहेत.
शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काही गुंतवणूकदारांनी एकत्र येत शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्याबरोबर जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून आपली कैफियत मांडली आहे. परंतु अद्याप कुठलीही कारवाई झाली नसल्याचे समजते.
शेवगाव तालुक्यातील जवळपास 20 ते 25 तरुणांनी कोट्यावधींची माया गोळा करून पोबारा केला आहे. या तरुणांनी किती पैसे नेले या विषयी ठोस आकडा उपलब्ध नाही. परंतु जवळपास 500 ते 600 कोटी रुपयांची लूट झाली असल्याची गुंतवणूकदारात चर्चा आहे.
तालुक्यातील जनतेची एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्यामुळे, सध्या शेवगाव तालुक्यावर आर्थिक आणीबाणी ओढावली आहे. बाजारपेठेत सुद्धा याचे पडसाद उमटले आहेत. परिसरात प्लॉट, जमीन खरेदी-विक्री व्यवहार सु्द्धा मंदावल्याचे दिसून येत आहे.एकूणच तालुक्यातील जनता सध्या आर्थिक विवंचनेत सापडली आहेत. याचे दुरगामी परिणाम पाहायला मिळणार आहेत. शेअर बाजार ट्रेडिंगमध्ये जिल्ह्यासह राज्यात नाव झालेला तालुक्यातील एक युवक मागील तीन चार दिवसांपासून बेपत्ता असल्याची चर्चा आहे. आता पोलिस प्रशासनाच्या भुमिकेकडे सार्यांचे लक्ष लागून आहे.