संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव ः शेअर बाजार ट्रेडिंगच्या नावाखाली शेवगाव तालुक्यातील लोकांची आर्थिक फसवणूक करून अनेक तथाकथित ट्रेडर्स फरार झालेले आहेत, अशातच तालुक्यातील कोळगाव येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. शेवगाव तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी राहणारा रामदास सुखदेव झिरपे (वय36) या तरुणाने सोमवारी (दि.27) च्या पहाटे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
गुंतवणूकदारांच्या तगाद्याला कंटाळून रामदासने आत्महत्या केली असावी, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. रामदास हा कोळगाव येथे शेअर बाजार ट्रेडिंग करणार्या विठ्ठल ताराचंद झिरपे या तरुणाच्या ट्रेडिंग ऑफिसमध्ये कॅशियर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी विठ्ठल झिरपे हा गुंतवणूकदारांची गुंतवणूक घेऊन फरार झाला होता. त्याच्याकडील अनेक गुंतवणूकदारांनी रामदास झिरपे याच्याकडे पैशाची मागणी केली. तुझ्याकडे पाहून आम्ही पैसे टाकले होते, तू आमच्या पैशाची सोय कर, विठ्ठलचा शोध घे आणि आमचे पैसे आणून दे अशा प्रकारे विठ्ठल झिरपे याचे गुंतवणूकदार कॅॅशियर असलेल्या रामदासकडे तगदा लावत होते. आपण विठ्ठल झिरपेचा शोध लावू शकत नाहीत. या गुंतवणूकदार लोकांचे पैसे सुद्धा परत करु शकत नाहीत, म्हणून रामदास झिरपे प्रचंड तणावाखाली वावरत होता. अशातच त्याने सोमवारी पहाटे गळफास घेऊन आपली जिवण यात्रा संपवली. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर रामदासवर कोळगाव येथे शोकाकूळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामदास झिरपेच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे, दरम्यान या घटनेमुळे शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणारा पळून गेला. परंतु रामदासचा नाहक बळी गेल्याने कोळगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे आपल्या आयुष्यभराची कमाई गेली म्हणून गुंतवणूकदार सुद्धा प्रचंड तणावाखाली असून परिणामी घराघरात वाद वाढले आहेत. अनेक लोक व्यसनाधीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतील की काय अशी भिती निर्माण झाली आहे. एकूणच अशा परिस्थीतीत अडकलेल्या लोकांना आवाहन करताना डॉ. निलेश मंत्री म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी वाईट काळ येतोच, यावेळी शांत राहून थोडा काळ जाऊ द्यावा लागतो. कोणत्याही समस्येवर समाधान असतेच, यातून सुध्दा मार्ग निघेलच पण स्वतः वर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे. ट्रेडिंग करणार्या तरुणांनी सुद्धा गुंतवणूकदारांना सामोरे जाऊन यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, पळून जाणं हा पर्याय होऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले.