शिर्डी लोकसभा मतदारसंघ राजकीय वार्तापत्र

शिर्डी लोकसभा मतदारसंघ राजकीय वार्तापत्र
राजकुमार गडकरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी- महाराष्ट्रात क्षेत्रफळाने व लोकसंख्येने मोठा असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघ व शिर्डी लोकसभा मतदारसंघ असे दोन लोकसभेचे मतदारसंघ असून या जिल्ह्यातून दोन खासदार लोकसभेवर निवडून जातात.
शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून सध्या येथे लोकसभा निवडणूक 2024 साठी राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात हळूहळू तापू लागले आहे. पण अ.नगर लोकसभा मतदारसंघा पेक्षा मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघात अजूनही म्हणावा असा भडक प्रचार सध्या तरी दिसून येत नाही.


शिर्डी हे श्री साईबाबामुळे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र झाले आहे. त्यामुळे शिर्डीची ओळख संपूर्ण देश-विदेशात झालेली असून येथून खासदार होण्यासाठी मोठे प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. मात्र ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे येथे अनुसूचित जाती वर्गातीलच उमेदवार उमेदवारी करणार असल्यामुळे राज्यातील अनेक मात्तबर राजकीय नेते येथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतात. यावेळीही अनेक जण शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.व अजूनही आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये महा विकास आघाडी कडून भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांना उमेदवारी दिली गेली आहे.ही सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला गेल्यामुळे नुकतेच भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना महाविकास आघाडीकडून ही उमेदवारी जाहीर झाली. तर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना महायुती कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. ते ठाकरे गटातून शिंदे गटात नुकतेच गेले असून त्यांना शिवसेना शिंदे गटाकडून ही उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्हीही उमेदवार शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गावागावात जाऊन नेते, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. यात्रा, विविध कार्यक्रमांना भेट देत आहेत. विशेष म्हणजे भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते व परत शिवसेना ठाकरे गटात आले त्यामुळे ठाकरे गटातील शिवसेनेमध्ये काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सध्या त्यांच्याकडून होत आहे. तीच परिस्थिती खासदार लोखंडे यांच्याबाबत असून खासदार लोखंडे हे शिवसेनेतून शिंदे गटात गेले. लोखंडे हे दोनदा येथून खासदार म्हणून निवडून गेले मात्र त्यांचा अनेक गावांमध्ये संपर्क अधिक नसल्याने नागरिकांमधून, मतदारांमधून असणारी नाराजी ही मतदार बोलून दाखवत आहेत. ही नाराजी दूर करण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपाचे असल्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांना त्यांचे मोठे राजकीय पाठबळ मिळणार आहे. नामदार विखे यांनी यापूर्वीच अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन लोखंडे यांच्या प्रचार कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या येथे महायुती व महाविकास आघाडीचे दोन्हीही उमेदवार प्रचारात मग्न असतानाच या मतदारसंघात नुकताच एक नवीनच राजकीय टि्वट निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या प्रदेश महासचिव व राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी नुकतीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत त्यांनी प्रवेश केला आहे. त्यांना वंचित बहुजन आघाडी तर्फे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता असून त्यामुळे येथे तिरंगी लढत होईल. अशी चर्चा सध्या सुरू असून तिरंगी लढत झाली तर खूपच अटीतटीची शिर्डीत लोकसभा निवडणूक होईल. व या तिरंगी लढतीत कोणाचा फायदा होईल, हे सांगता येत नाही. उत्कर्षा रूपवते काँग्रेस सोडून वंचित बहुजन आघाडीत गेल्यामुळे त्याचा फटका कोणाला बसेल किंवा कोण विजय होईल याचे सर्व गणित आता त्यामुळे बदलले असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
सोळा वर्षे काँग्रेसमध्ये काम करून आपणाला तिकीट दिले नाही अशी नाराजी व्यक्त करत उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे व त्यांनी वंचित कडून उमेदवारी करण्याचे संकेत दिले आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शिर्डी मधून उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी केली होती. मात्र महायुतीकडून खासदार लोखंडे यांना उमेदवारी दिल्यामुळे ते व त्यांचे कार्यकर्तेही नाराज आहेत. असे कार्यकर्त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. अशी राजकीय परिस्थिती शिर्डीत निर्माण झाली असून येथे राजकीय पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर सन 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांना तीन लाख 59 हजार 921 मते पडली होती तर आरपीआयचे रामदास आठवले यांना दोन लाख 27 हजार 170 मते पडली होती. त्याचवेळी अपक्ष म्हणून प्रेमानंद दामोदर रुपवते हे येथून लढत होते त्यांना 22 हजार 787 मते पडली होती. यावेळी भाऊसाहेब वाकचौरे खासदार म्हणून निवडून आले होते.
तर सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांना पाच लाख 32 हजार 936 तर भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांना 3 लाख 33 हजार चौदा मते पडली होती. यावेळी येथे खासदार लोखंडे झाले होते.
सन 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांना चार लाख 83 हजार 449 मते तर काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांना तीन लाख 64 हजार 113 मते पडली होती.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पंधरावी लोकसभा 2009 ते 2014 या कालावधीत भाऊसाहेब राजाराम वाकचौरे हे शिवसेनेचे खासदार होते.
त्यानंतर ते भाजपकडे गेले. त्यामुळे शिवसेनेने सदाशिव लोखंडे यांना पुढच्या निवडणुकीत उमेदवारी दिली. व सोळाव्या लोकसभा सन 2014 ते 2019 या काळात सदाशिव किसन लोखंडे हे खासदार म्हणून निवडून आले.
त्यानंतर 17 व्या लोकसभा सन 2019 च्या निवडणुकीतही सदाशिव किसन लोखंडे हे शिवसेनेकडून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र ते शिंदे गटात दाखल झाले .ते शिवसेना शिंदे गटाकडून सध्या उमेदवारी करत महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी,व वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघात वाकचौरे व लोखंडे यांचा प्रचार सध्या सुरू आहे. अद्याप उमेदवारी अर्ज कोणी भरले नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरल्यानंतर येथे खरा प्रचार सुरू होईल .असे बोलले जाते. या निवडणुकीत महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचीही मोठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे तेथील आजी-माजी आमदारांचीही या निवडणुकीत भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय अनेक इच्छुक उमेदवार ही शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी करण्याच्या मार्गावर आहेत. एकूणच शिर्डीत महाविकास आघाडी, महायुती व वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी व महायुती च्या उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. वंचितच्या उत्कर्षा रूपवते ह्या पुढे काय करणार! याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. परंतु सध्या तरी शिर्डी लोकसभा मतदारसंघात नगर लोकसभा मतदारसंघाच्या तुलनेत अजून तरी प्रचार फारसा शिगेला पोहोचलेला नाही. कोणत्याही पक्षाचे स्टार प्रचारक, मोठे नेते, या लोकसभा मतदारसंघात अजून आले नाही. सभा झाल्या नाही. मात्र लवकरच त्या होतील असे उमेदवारांकडून बोलले जात असले तरी गाव पुढारी, कार्यकर्ते सोडले तर मतदारांमध्ये अजूनही या निवडणुकी संदर्भात किंवा प्रचारासंदर्भात फारसा रस दिसून येत नसल्याचे सध्या या मतदारसंघात चित्र दिसत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!