‘वर्षा’वरील राजकीय बैठकीचे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर; काँग्रेसकडून कारवाईची मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आचारसंहिता लागू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झालेल्या राजकीय बैठकीचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर केले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी आज दिली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचे पुरावे सादर केल्यानंतर आता तरी निवडणूक आयोग डोळ्यावरील पट्टी काढून कारवाई करील का असा सवालही त्यांनी केला
वर्षा बंगल्यावर झालेल्या राजकीय बैठकांची तक्रार सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारीवर निवडणूक आयोगाने सचिन सावंत यांना पुरावे सादर करण्यास सांगितले होते. सचिन सावंत यांनी या बैठकीच्या संदर्भातील पुरावे निवडणूक आयोगाला आज सादर केले. यासंदर्भात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सचिन सावंत म्हणाले की, 24 व्हिडीओ असलेला एक पेन ड्राईव्ह आणि माध्यमांमधून छापून आलेल्या बातम्यांची प्रत निवडणूक आयोगाला सादर केली आहे. विरोधी पक्षांवर ज्या तत्परतेने कारवाई केली जाते, तेवढी तत्परता सत्ताधारी पक्षांच्या बाबतीत आयोग दाखवताना दिसत नाही. वर्षावरील बैठकांचा पुरावा सादर केल्यानंतर तरी निवडणूक आयोग कारवाई होईल.