संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : (सोमराज बडे) – तालुक्यातील वडगांव येथे ऊस घेऊन जाणारा मालवाहतूक ट्रक सोमवारी दुपारी पलटी झाला आहे. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. परंतु शेतक-याचे नुकसान झाले. सोमवारी दुपारी उसाने भरलेला ट्रक (क्र. एम एच ४ सी .यू. ८९९४) हा ट्रक वडगांव शिवारातून ऊस घेऊन साखर कारखान्यावर निघाला असतांना वडगांव- पिंपळनेर रस्त्यावर वळण घेत असतानाच ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या घटने दरम्यान चालक व क्लिंनरला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
वडगांव चिंचपुर पांगुळ रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण कामाचा सुमारे तीन चार महिन्यांपूर्वी उदघाटन कार्यक्रम झाला होता. परंतु ठेकेदारांच्या हलगर्जीमुळे हे काम मागील आठवड्यापासून संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ऊस वाहतूक व इतर वाहनधारकांना या कामामुळे पिंपळनेरमार्गे अरुंद,अवघड ,कच्या रस्त्याने जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागत आहे. रस्त्यामुळेच अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वडगांव परिसरामध्ये उसाचे मोठे क्षेत्र आहे.
रोज अनेक उसाच्या ट्रॅक्टर ,ट्रक गाड्यांची वडगांव ,ढाकणवाडी,चिंचपूर या गावातून ये- जा सुरू असते.
त्यामुळे काही मोठी दुर्घटना घडण्याआधी लवकरात लवकर वडगांव चिंचपुर मार्गाचे अतिक्रमण काढून डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.