ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
New Delhi – देशातील वाढत्या कोरोना रुग्णांचा पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधानांनी सर्व राज्यांना महत्त्वाच्या सूचना तसेच सल्ले दिले आहेत. प्रत्येक राज्यातील कोरोना आणि कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यांमध्ये रात्रीची संचार बंदी लागू करण्याच्या सूचना मोदींनी सर्व राज्यांना केल्या आहेत. त्याचप्रमाणे गर्दीच्या कार्यक्रमांना, गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध आणावेत असे आदेश सर्व राज्यांना देण्यात आले आहेत.
देशातील येत्या काळातील सण उत्सव लक्षात घेऊन रुग्ण वाढले तर त्वरित कंटेन्मेंट आणि बफर झोन तयार करावेत असे मोदींनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे कोरोना चाचण्या आणि रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांवर लक्ष ठेवा. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घ्यावा यावा. प्रत्येक राज्यातील रुग्णालयातील बेड, आरोग्य उपकरणे तसेच अँब्युलन्स ऑक्सिजन पुरवठ्यासाठी बफर स्टॉक बनवा तसेच ३० दिवसांच्या औषधांचा साठा प्रत्येक रुग्णालयात करावा असे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत.
राज्यासह देशातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. कोरोना व्हायरस, तसेच लसीकरणाबाबत कोणत्याही अफवा पसरवू नयेत अशी विनंती पंतप्रधनांनी केली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे, दारोदारी जाऊन लसीकरण मोहीम राबवावी असे आदेश पंतप्रधानांकडून देण्यात आले आहेत.
पंतप्रधानांच्या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्ससोबत बैठक घेणार आहेत.
देशात सध्या ओमिक्रॉन बाधित एकूण ३१३ रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात ८८ रुग्ण, दिल्लीत ६४, तमिळनाडूमध्ये ३४, कर्नाटकमध्ये ३१ ऑमोक्रॉन बाधित रुग्ण आहेत. तसेच राजस्थानमध्ये १८, केरळमध्ये २४, गुजरातमध्ये २३, तेलंगणामध्ये १८ ओमिक्रॉन बाधित रुग्ण आहेत.
https://godatirnews.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87/