संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा झाली असून पश्चिम महाराष्ट्र विभागासाठी साप्ताहिक सिटी टाइम्सचे संपादक राजेश सटाणकर यांना जाहीर झाला आहे.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व दैनिक मराठवाडासाथीच्या वतीने देण्यात येणाऱ्या सकारात्मक लेखनासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. दर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत. लवकरच या पुरस्कारांचे वितरण एका शानदार कार्यक्रमात होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे व दै. मराठवाडासाथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी दिली.
राजेश सटाणकर यांना सलग ४० वर्षाचा वृत्तपत्रातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. याशिवाय नगर शहर विकासाबाबतचे अनेक लेख,बातम्या,समाजोपयोगी लेखन,विकासात्मक लेख,नागरी प्रश्न मांडून प्रबोधनात्मक आणि राजकीय विश्लेषण,टीकाटिप्पणी, अग्रलेख,प्रासंगिक लेख, वार्तापत्र मान्यवर दैनिकात जिल्हा आणि राज्यस्तरीय आवृत्तीत प्रसिद्ध झाले असून दै.नवामराठा, दै.गावकरी, दै.लोकयुग, दै.सायं.आनंद, दै.लोकपत्र ,दै.पुण्यनगरी, दै.भुईकोटनगरी, दै. लोकआवाज या दैनिकांसह नगर केबल नेटवर्क या वृत्तवाहिनीच्याही प्रमुख पदांवर राजेश सटाणकर यांनी काम केले आहे.याशिवाय नगर व पुणे आकाशवाणीवरही अनेक लेखांचे प्रसारण झाले आहे.
सन १९८९ चा पत्रमहर्षी दा.प.आपटे पत्रकारिता पुरस्कार महाराष्ट्र टाइम्स चे तत्कालीन संपादक अशोक जैन यांच्या उपस्थितीत तत्कालीन केंद्रीय मंत्री मधू दंडवते यांच्या हस्ते तर इंदिरा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार सन २००६ ला राज्याचे तत्कालीन कॅबिनेट मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते,तर राज्यशासनाच्या पर्यटन विभागातर्फे आदर्श पत्रकारिता पुरस्कार तत्कालीन पालकमंत्री ना. बबनराव पाचपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.तसेच ऐतिहासिक लेखनासाठी शरीफजीराजे भोसले पुरस्कार देखील मिळाला आहे.सिटी टाइम्स प्रकाशनाचे यंदाचे ३८ वे वर्ष आहे. या सर्व माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
सार्वजनिक जीवनात सामाजिक जाणिवेतून काम करण्याचे प्रयत्न गेले ४० वर्षांपासून ते करत आहे आणि यापुढेही ते कार्यरत राहतील.