संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- तालुक्याच्या राजकारण व समाजकारणात ढाकणे कुटूंबिय थांबले तर तुमच्या पिळवणुकीला सुरूवात झाली म्हणून समजा.सध्या चालू असलेला अन्याय रोखायचा असेल तर मला राजकारणात जिवंत ठेवा. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आम्हाला साथ द्या,या प्रस्थापितांना वाकवून दाखवितो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॕड.प्रतापराव ढाकणे यांनी केले.
चिंचपूर इजदे ग्रामस्थांनी भगवानगड पाणी योजनेत चिंचपूर इजदे गावाचा समावेश केल्याबद्दल अॕड.ढाकणे यांचा नागरी सत्कार केला. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे होते. बंडू पाटील बोरूडे, महारूद्र कितने, सिताराम बोरूडे,अजय पाठक,उध्दव दुसंगे, गहिनीनाथ शिरसाट, दिगंबर गाडे, हुमायून आतार, दत्ता खेडकर, आजिनाथ खेडकर, संदीप पालवे, डाॕ.राजेंद्र खेडकर माऊली खेडकर, पांडूरंग शिरसाट आदी उपस्थित होते.
ढाकणे म्हणाले, राजकीय जीवनात लोकांचे प्रेम मिळायला नशिब लागते.माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्यावर या परिसराने खूप प्रेम केले.आज मी कुठल्याही पदावर नसलो तरी असेच प्रेम करत आहेत.तीस वर्षे सातत्याने काम करतोय.पराभव पचवले पण घरात बसलो नाही. तालुक्यात आज प्रशासन ढिम्म होऊन बसले आहे. पंचायत समिती, नगरपालिका, तहसिल कार्यालय येथून ठराविक दलाल राजळेंच्या इशा-यानुसार काम चालवतात.कामांना मंजुरी नसताना केल्याचे सांगत लोकांची फसवणूक चालविली आहे.आघाडी सरकार राज्यात सत्तेत आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आल्यापासून तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला. शेवगाव वा पाथर्डीसाठी जायकवाडी धरणातून स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी मिळवविली. असेच काम यापुढेही करायची आहेत. फक्त तुम्ही साथ द्या,मला कुणाकडून कमिशन खायचे नाही.त्यामुळे येत्या निवडणूकांत आम्हाला प्रोत्साहन द्या असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
शिवशंकर राजळे म्हणाले,मागच्या विधानसभा निवडणुकीत आमदारांनी १ हजार २०० कोटींचा निधी आणल्याचा दावा केला.मात्र प्रत्यक्षात विकास दिसत नाही.आमदार केवळ नारळं फोडून मोकळे होतात आणि विकास मात्र गायब आहे.त्यांच्याकडून नेहमी भावनिकता निर्माण करत मते मागितली जातात.नंतर सर्व जाणीवपूर्वक विसरवले जाते.ढाकणेंनी सामान्यांना मोठे केले.ज्यांनी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्षपद सोडले नाही ते तुम्हाला काय न्याय देणार?
प्रास्तविक माजी पंचायत समिती सदस्य वसंतराव खेडकर यांनी केले. आभार बाजार समितीचे संचालक वैभव दहिफळे यांनी मानले.