संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राज्यात जरी काही जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढत आहे. माहितीनुसार राज्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण ३ हजारांहून अधिक आहेत. म्युकरमायकोसिसच्या उपचारांचा खर्च काहींना परवडत नाही आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांकडे कोणतेही रेशनकार्ड असेल तर त्यांना १ रुपयांचा खर्च लागू नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबतची माहिती आजच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे म्हणाले की, ‘म्युकरमायकोसिसच्या संदर्भात मी अतिशय जबाबदारीने सांगेल की, काल सुद्धा आम्ही स्पष्ट जीआर काढला आहे. ज्यामध्ये कुठेही अस्पष्टता नाही. म्युकरमायकोसिसचे प्रमाण वाढतायच हे नक्की आहे. त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे ही आमची आणि आरोग्य विभागाची महत्वाची जबाबदारी असल्याचे समजतो. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनामध्ये जरी १ हजार रुग्णालय असतील तरी त्यातील १३१ रुग्णालय प्रत्येक जिल्ह्यात २ ते ३ रुग्णालय आपण ठरवून दिली आहेत. म्हणजेच या ठिकाणी म्युकरमायकोसिस रुग्णांची तपासणी किंवा त्याच्यावर उपचार केले जातील. याठिकाणी सर्व सर्जन उपलब्ध असायला पाहिजे. त्यामुळे या रुग्णालयांची निवड करून त्यांना लागणारे अॅम्फोटेरेसिनी बी (Amphotericin B) हे सगळ्या रुग्णांना मोफत पुरवले पाहिजे, अशा सर्व सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.’