मुंबई -मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ वरून ४.४० टक्के वर आला आहे. त्यामुळे मुंबई तिसऱ्या स्तरामधून दुसऱ्या स्तरात येणे आणि त्यामुळे मुंबईतील निर्बंधात आणखीन शिथिलता येण्याची मुंबईकरांना अपेक्षा होती; मात्र पालिका प्रशासनाने यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. परिणामी मुंबईकरांचा काहीसा हिरमोड झाला असून मुंबईकरांना दिलासा मिळण्यासाठी आणखीन काही दिवस तरी प्रतिक्षाच करावी लागणार आहे. पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी, निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता दिल्यास कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. यामुळे दहा ते पंधरा दिवस आम्ही वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत. दुसऱ्या स्थरातील निर्बंध लागू करण्याबाबत महापालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुंबईत Covid-19 तिसर्या स्थराचे निर्बंध कायम असल्याचे सांगितले.
राज्य सरकारने राज्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक जिल्हा कोणत्या स्तरात आहे, त्यासाठी कोणते निर्बंध लागू असतील आणि किती प्रमाणात शिथिलता असेल याबाबतचे निकष ठरवले आहेत. त्यानुसार ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये ७ जूनपासून शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट यापूर्वी ५.२५ होता म्हणून मुंबई तिसऱ्या स्तरात होती. मात्र आता मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ४.४० टक्के झाला आहे. मात्र कोरोनाच प्रसार अद्याप कमी झालेला नसल्याने तिसऱ्या स्थरातील निर्बंध यापुढे आणखी काही दिवस लागू राहणार आहेत.