संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी ः तालुक्यातील मांडवे येथील खून प्रकरणात मित्रच मारेकरी निघाला आहे. यामुळे मित्राला नगर एलसीबी टिम’ने ताब्यात घेतला आहे. अमोल नवनाथ आठरे (वय 20, रा. कौडगांव आठरे ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, नगर अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार पोउपनि सोपान गोरे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, सुरेश माळी, संतोष लोढे, संदीप चव्हाण, देवेंद्र शेलार, संतोष खैरे, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर आदींच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, भाऊ अविनाश बाळू जाधव (रा. मांडवे ता. पाथर्डी) हा त्याच्या घरासमोर पढवीमध्ये झोपलेला असतांना त्यास कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी त्याच्या डोक्यामध्ये कोणत्यातरी धारदार हत्याराने मारहाण करुन खून केला आहे, महेश बाळु जाधव (रा. मांडवे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर हल्ली रा. मोगरेवस्ती, साने कॉलनी, झेंडाचौक एनक, पिंपरी चिंचवड, पुणे) यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 486/2024 भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने एसपी राकेश ओला यांनी पोनि श्री.आहेर यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या. आदेशान्वये पोनि श्री.आहेर यांनी गुन्हा घडले ठिकाणी मांडवे (ता. पाथर्डी) या ठिकाणी भेट देऊन घटनाठिकाणची पाहणी केली होती. एलसीबी टिमने गुन्हा ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, गुन्हा घडले ठिकाणी कोठेही सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसल्याने आरोपीची काहीएक माहिती मिळून येत नव्हती. पोलिसांनी मयत अविनाश बाळू जाधव याच्या कोणासोबत यापूर्वी वाद होते काय याबाबत माहिती काढली असता मयताचे व मयताचा मित्र अमोल नवनाथ आठरे (रा. कौडगांव आठरे, ता. पाथर्डी) याच्यासोबत वाद झाल्याबाबत माहिती प्राप्त झाली. एलसीबी टिमने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे अमोल नवनाथ आठरे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपूस केली. त्याने सांगितले की, मी व अविनाश जाधव असे दोघे मित्र होतो. अविनाश जाधव याने मला गांजा पिण्याचे व्यसन लावले होते तसेच अविनाश जाधव हा मला नेहमी गांजा ओढण्यासाठी व दारु पिण्यासाठी नेहमी पैशाची मागणी करत असे. मी व अविनाश जाधव मित्र असल्याने आमचे एकमेकांचे घरी नेहमी येणे जाणे होते. अविनाश जाधव यास दारु व गांजा ओढण्याचे व्यसन असल्याकारणाने माझे आई वडिल मला व अविनाश जाधव यास रागावून बोलत असे. दि.1 मे 2024 रोजी अविनाश जाधव याने माझे वडिल दूध विकत असलेल्या ठिकाणी तिसगांव येथे जाऊन त्यांना त्या ठिकाणी शिवीगाळ करुन, हात पाय तोडून टाकण्याची धमकी दिली. दूध सांडून दिले होते. त्यामुळे त्या दिवशी मी अविनाश यास तू माझे वडिलांना शिवीगाळ का केली व धमकी का दिली ? याबाबत जाब विचारला असता त्याने मला सुद्धा शिवीगाळ दमदाटी केली. त्या कारणावरुन दि.4 मे 2024 रोजी रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास मी आमचे घरुन ऊस तोडण्याचा कोयता घेऊन गाडीचा आवाज येऊ नये म्हणून माझेकडील इलेक्ट्रीक गाडीवरुन अविनाश जाधव याच्या घरी जातेवेळी माझेकडील कोयत्याने रस्त्याकडेला असलेल्या बाभळीचे झाडाची फांदी तोडून अविनाश जाधव याचे घरी गेलो. माझेकडील दुचाकी त्याच्या घरासमोर लावून त्याच्या घराकडे जाऊन पाहिले असता अविनाश जाधव हा त्याचे पढवीमध्ये झोपलेला होता. मी माझेकडील बाभळीचे काठीने त्याचे डोक्यामध्ये मारले असता तो उठून बसला परंत,ु तो नशेमध्ये असल्याने त्यास काहीही समजत नव्हते. त्यास मी पुन्हा माझे हातातील काठीने मारले असता आमचे दोघामध्ये झटापट झाली. अविनाश जाधव हा मला मारण्यासाठी काहीतरी हत्यार शोधत असतांना मी माझे गाडीवर ठेवलेला कोयता घेऊन कोयत्याने त्याचे डोक्यावर, पाठीवर वार केले असता तो मोठ्याने आरडाओरडा करु लागल्याने मी तेथून पळून आलो असल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी अमोल नवनाथ आठरे (वय 20, रा. कौडगांव आठरे ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यास पाथर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. 486/2024 भादवि कलम 302 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी पाथर्डी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले. पुढील तपास पाथर्डी पोलीस हे करीत आहेत.