माझी वसुंधरा स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे यश


👉नगरपंचायत गटात शिर्डी राज्यात सर्वप्रथम तर कर्जत द्वितीय
👉मिरजगाव, लोणी बु. ग्रामपंचायत, संगमनेर नगरपरिषदेचाही गौरव
👉वैयक्तिक गटात जिल्हाधिकारी डॉ. भोसले राज्यात सर्वोत्कृष्ट तर मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांचा द्वितीय पुरस्काराने गौरव

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर: -राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानात सन २०२०-२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषदा, महानगरपालिका आणि वैयक्तिक रित्या चांगली कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यांना आज मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत दूरदृश्यप्रणालीद्वारे पार पडलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात गौरवण्यात आले. या अभियानात अहमदनगर जिल्ह्याने आपला ठसा उमटवून विविध पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. ग्रामपंचायत गटात मिरजगाव (तालुका कर्जत) ने द्वितीय तर लोणी बुद्रुक (ता. राहाता) ने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. नगरपंचायत गटात शिर्डी नगरपंचायतने राज्यात सर्वप्रथम क्रमांक पटकावला तर कर्जत नगरपंचायतीला द्वितीय पारितोषिक मिळाले. नगरपरिषद गटात संगमनेर नगरपरिषदेने उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक पटकावला. वैयक्तिक स्तरावर चांगली कामगिरी करणार्‍या अधिकार्‍यांना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये जिल्हाधिकारी गटात अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गटात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
आज मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांना ऑनलाईन पद्धतीने पारितोषिके प्रदान करण्यात आली. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. तर प्रत्येक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अभियानात सहभागी महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे यात सहभागी झाले होते.
यावेळी मान्यवरांनी पर्यावरण रक्षणासाठी सर्वांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे सांगितले. पर्यावरण संतुलनासाठी सर्वांनी काम करणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन महत्वाचे आहे. त्यासाठी राज्य शासन काम करीत आहे. राज्यातील सर्व गावे, सर्व शहरे सुंदर झाली पाहिजेत, यासाठी नागरिकांनीही पुढे आले पाहिजे. प्रत्येकाने स्वयंशिस्त, सार्वजनिक स्वच्छता, वृक्षलागवडीच्या माध्यमातून गावे व शहरे सुंदर करावीत. ज्याप्रमाणे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला, त्याचपद्धतीने या माझी वसुंधरा अभियानात सर्वांचा सहभाग असावा. प्रत्येकाने किमान दोन झाडे लावणे आणि ती जगविली पाहिजेत, अशी अपेक्षा या मान्यवरांनी व्यक्त केली.
अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद आणि वैयक्तिक गटात जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. क्षीरसागर यांना मिळालेल्या पारितोषिकांबद्दल महसूलमंत्री श्री. थोरात आणि पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी या सर्वांचे आणि अभियानात भाग घेतलेल्या प्रत्येक गावातील सरपंच, पदाधिकारी, अधिकारी, नगरपंचायत-नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी व इतर अधिकारी-पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!