👉वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये – मुख्यमंत्री
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरला असून अजूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापुर्वी महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षांतील नेते मंडळींनी आपला वाढदिवस साजरा करु नये असे आवाहन कार्यकर्त्यांना केलं होत. आता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना पोस्टर्स, बॅनर न लावण्याचे आवाहन करत वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.