भाजपचा ओबीसी मेळावा : नव्या राजकारणाची मुहुर्तमेढ ?

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
(
राजेश सटाणकर)

भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा या पक्षातंर्गत संघटनेच्या नगर शाखेने इतर मागासवर्गीयांचा मेळावा येत्या १५ जूनला नगर शहरात आयोजित केला आहे. मांडव घातला नाही, पताका लावलेल्या नाहीत,अशी एकही संधी राजकीय पक्ष सोडत नाही. बदलत्या काळात पताकांऐवजी फ्लेक्स अन् मांडव ऐवजी कमान व उंचावर पक्ष ध्वज लावले जातात. त्यात भाजप एकही संधी सोडत नाही. देशाच्या कुठेही भाजपला एकही संधी मिळाली की येथे फटाकडे तरी फोडतीलच.अलिकडे राज्यसभा निवडणूकीत मिळालेले यश नगरात पक्षाने जल्लोष केला.तसा हा मेळावा असून,नगरात पक्ष या निमित्ताने शहरातील संपूर्ण ओबीसी समाजाचा दबाव गट निर्मांण करण्याच्या दृष्टीने पावलं तर टाकत नाही ना ? अशी शंका आहे.मेळाव्याला जिल्ह्यातील तीन माजी मंत्री सर्वश्री प्रा.राम शिंदे, शिवाजीराव कर्डीले आणि आ.बबनराव पाचपुतेंसह विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पा, आ. मोनिका राजळे,यांची,तर पक्षाच्या इतर मागासवर्गीय मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष श्री.तळेकर अण्णा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


पुर्वाश्रमीचे शिवसेनेचे खन्दे समर्थक किशोर डागवाले, लागोपाठ पालिकेवर १९९७ पासून नगरसेवक म्हणून राजकारणात घोडदौड करत होते. पण गत २०१८ च्या महापालिका निवडणुकीत डागवालेंचा प्रथमच पराभव करून त्यांची घोडदौड शिवसेनेने रोखली.तेव्हापासून डागवाले राजकारणातून बाजूला गेले होते.त्या निवडणुकीत डागवाले भाजपचे उमेदवार होते. अलीकडे पक्षाने त्यांना ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्त केल्याने डागवाले यांनी त्यांच्यापासून दुरावलेल्या विविध पक्षाच्या सहकाऱ्यांना जवळ करत पद स्वीकारून ओबीसीचा नवीन चेहरा म्हणून डागवाले राजकारणात पुन्हा सक्रिय झाले. या माध्यमातून त्यांची राजकारणातील विस्कटलेली घडी पुन्हा बसवत ओबीसींच्या हक्काची हाक ते देत आहेत.या पार्श्वभूमीवरच ओबीसीचा मेळावा पक्षाने आयोजित केला असला तरी त्यामागे वेगळेच राजकारण शिजत असल्याचे समजते.भाजपला देशात समान नागरी कायदा आणायचा आहे म्हटल्यावर ते ओबीसीच आरक्षण कसे देतील ? असा सवाल उपस्थित होत असला तरी नगर शहर हे ओबीसींची वोट बँक असल्याने या माध्यमातून विधानसभा डोळ्यासमोर ठेवत भाजपने डागवाले यांना ओबीसींची मोट बांधण्याची जबाबदारी दिली.त्यांनीही राजकारणात पुन्हा श्रीगणेशा करत गमावलेली संधी डोळ्यासमोर ठेवली असे म्हणायला हरकत नाही.
पुर्वाश्रमीचे भाजपाचे पण नंतर २० वर्षे काँग्रेस मध्ये निष्ठेने कार्य करत बाळासाहेब भुजबळ यांनी १५ वर्ष काॅं.शहराध्यक्ष पद भूषविले पण काँग्रेसनेच त्यांना पक्ष पदावरून रिक्त करत नंतर पक्षा बाहेरचा रस्ता दाखवला.असे बाळासाहेब भुजबळ यांनी स्वगृही म्हणत भाजपमध्ये अलीकडेच पुन्हा प्रवेश केला.भुजबळ यांचे शहराध्यक्षपद काँग्रेस ने जेव्हा काढून घेतले होते. त्याच वेळी शहरातील काॅंग्रेससह सर्व पक्षातील ओबीसींनी त्यांना ओबीसी व्ही.जे.एन.टी जनमोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष पद बहाल केले होते. त्यांच्या कार्यकारिणीतील काँग्रेस पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांसह विविध पक्षाचे ओबीसी नगरसेवकांसह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीही भुजबळ यांचे नेतृत्व मान्य करून राजकारणात त्यांना ( भुजबळांना ) पर्याय मिळवून दिला.त्यांनीही जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे नेतृत्व स्वीकारले.सर्व पक्षातील आणि पक्षा बाहेरील ओबीसींचे संघटन आणि ओबीसींच्या हक्कासाठी संघर्ष करण्याची संधी या निमित्ताने भुजबळ यांना मिळाली.सोबतीला बारा बलुतेदार महासंघही होता. वर्ष सव्वा वर्षे हे संघटन शहरात उभे राहत असताना अलीकडे भुजबळ भाजपात दाखल झाले. भुजबळ यांचा पक्षप्रवेश तसा अनेकांना विशेषत: जनमोर्चा आणि बारा बलुतेदारांना रुचलेला नाही.त्यात भाजपा ओबीसी आरक्षण लांबवत असल्याचा आरोप केला जात आहे.त्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ओबीसी आरक्षणासाठी ठोस भूमिका घेत नाही. एकंदर पक्षविरहित संघटनाच ओबीसींच्या हक्कासाठी संघर्ष करू शकेल .यासंघर्षात राजकीय ओबीसी नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते आपआपल्या पक्षात राहून अशा अराजकीय संघटनेला ताकद देऊ शकतात.पण, अशा अराजकीय संघटनेतही गट-तट निर्मांण झाल्याने राज्यात ओबीसी व्ही.जे.एन.टी,आणि बाराबलुतेदारामध्ये उभी फूट झाली.बाराबलुतेदारांचे संघटन राज्यपातळीवर २०२० पुर्वीच सुरु तर जनमोर्चाचा झंझावात २०२० पासून सुरु झाला होता.औरंगाबादचा त्यानंतर नगरसह १/२ जिल्ह्यात ओबीसी व्हिजे एन टीचे झालेले मेळावे,जालन्यात रस्त्यावर उतारलेला लाखोचा ओबीसी राज्याने अनुभवला,सांगली मेळाव्याची तयारीपुर्वी हजारोंचा जमाव ठिकठिकाणी असत पण,त्यानंतर कोरोनामुळे हे संघटन थांबवावे लागले.अर्थात सगळच थांबलं होत.पण, परत तो जोश ओबीसीनी दाखवण्याऐवजी राज्यातील या संघटनेत उभी फूट झाली.ओबीसींचे आरक्षण राहते की, जाते अशा परिस्थितीत ओबीसी नेते एकमेकांपासून दुरावतात मग ओबीसींच्या न्यायासाठी सरकावर दबाव कोण टाकणार? हा प्रश्न उपस्थित होतो.इकडे नगरात
डागवाले आणि भुजबळ आज मेळाव्याची तयारी करत असले तरी त्यांच्यातही काही मतभेद होते.त्याचा गत पालिका निवडणुकीत डागवलेना फटका बसला होता.भाजपने या दोघांनाही एकत्र करत मेळाव्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली.मेळावा नाममात्र आहे.पण,त्यामागे भाजपाचे राजकारण मोठे आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत नगर शहर मतदार संघातून भाजपला संधी मिळावी या अपेक्षेने ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासमोर आव्हान उभे करत नसेल कशावरून? यापूर्वी जगताप – भाजप यांच्यात साटेलोटे होते.आता सेनेचे अनिल भैया राठोड हयात नाहीत.त्यामुळे जगताप यांना ठोस विरोध राहिला नाही. शहरात काँग्रेस कमकुवत आहे तर सेनेत दोन गट पैकी एक गट जगतापांना मदत करणारा ओळखला जातो.राठोड यांच्या निधनानंतर शहरातील राजकारणाची गणित बदलत जे भाजप जगतापांबरोबर छुपे राजकारण करत होते त्यांनी आता ओबीसी कार्ड वापरत जगताप यांना पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू केला असावा असं म्हणायला हरकत नाही.डागवालेही भाजपात असतांना जगतापांना समर्थन देत होते तर भुजबळ आघाडीचा धर्म पाळत जगतापांना मदत करत .ओबीसी व्हिजे एनटी जनमोर्चा आणि बाराबलुतेदार नेते,कार्यकर्ते आपापल्या कार्यक्रमात आ.संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम करत. एकंदर जगतापांची राजकीय घौडदौड चहुबाजूने सुरु झाली.आता विरोध नाही अशी स्थिती असतांना भारतीय जनता पक्षातर्फे अभय आगरकर,वसंत लोढा,नरेंद्र फिरोदिया, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांची नावे विधान सभेसाठी पुढे येत असून या प्रत्येकाचे स्वत:च्या हक्काचे आणि ओबीसी जातीय समीकरणांवरून उमेदवारीला विशेष महत्व निर्मांण होऊ शकते अशी पक्ष श्रेष्ठींशी चर्चा झाल्याचेही समजते सेनेकडून भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, या दोन माजी महापौरांसह युवासेनेचे विक्रम राठोड, शहर प्रमुख संभाजी कदम, आदी इच्छुक असले तरी सेनेच्या हक्काचे मतदान आणि अनिल भैया राठोड यांना मानणारा एक मोठा वर्ग कोणाच्या बाजूने जाऊ शकतो यावर सेनेचे गणित अवलंबून आहे.पण, याचा खोलवर विचार कोण करणार? त्यात सेनेला भाजपाचीही साथ शहरात तरी गरजेचे आहे. शहरातल्या काँग्रेसचे बदलते राजकारण सेनेला पुरस्कृत असले तरी भाजपने जगतापांसमोर आव्हान उभे करत ओबीसीचे कार्ड ते सर्रास वापरण्याचा प्रयत्न करणार असेल तर काॅंग्रेसचे किरण काळे हे भाजपलाही समर्थन देतील कारण संग्राम जगतापांचा पराभव आपण करावा किंवा ऐनवेळी जो आघाडीवर असेल तेथे काळे असणार हे उघड झाले . सेनेच्या दोन गटांपैकी एक गट जगतापांकडे गेला तरीही निष्ठावंत मूळ सैनिक भाजपा मागे येणार आणि किरण काळेंना तेच पाहिजे. भाजप राजकारण करताना सेनेला न दुखावता काँग्रेसची मदत घेत नव्या राजकारणाची मुहूर्तमेढ करत असून ओबीसीची मोट बांधण्यात ते किती यशस्वी होतात ? तुर्त त्याचा श्रीगणेशा हा मेळावा ठरणार आहे का? हे कळायला थोडं थांबावं लागेल.

Email : rajeshsatankar01@gmail.com / 9271459465

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!