संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर: पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथे अकरा वर्षांपूर्वी गाजलेल्या कांडेकर खून खटल्यात शिक्षा झालेल्या आरोपीची गुरुवारी (दि.९) दुपारी एक वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली. या आरोपीची करोना संसर्गामुळे पॅरोलवर सुटका झाली होती. शेतात काम करीत असताना त्याच्यावर हल्ला झाला. कांडेकर यांच्या खूनाचा बदला घेतल्याचा हा प्रकार असल्याचे सांगण्यात येते. सुपा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नारायण गव्हाण येथील माजी सरपंच व कांडेकर खून खटल्यातील आरोपी राजाराम शेळके यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पॅरोलवर सुटलेले शेळके त्यांच्या शेतात एकटेच काम करत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले. त्यात त्यांच्या मानेला गंभीर इजा झाली. त्यांना तातडीने शिरुर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. शेळके यांची हत्या कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र हा बदला घेण्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरू आहे.
नारायण गव्हाणचे (ता. पारनेर) तत्कालीन उपसरपंच प्रकाश भाऊसाहेब कांडेकर यांचा १३ नोव्हेंबर २०१० रोजी पुणे-नगर महामार्गावर गोळ्या झाडून खून झाला होता. या प्रकरणात पाच जणांना जन्मठेप, तर खुनासाठी शस्त्र पुरविणाऱ्या एका आरोपीला तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. कांडेकर यांच्या मृतदेहातून गोळी गायब केल्याचा आरोप असलेल्या सरकारी डॉक्टरांची पुराव्या आभावी सुटका झाली होती. मार्च २०१७ मध्ये कोर्टाने हा निकाल दिला.
शिक्षा झालेल्यांमध्ये माजी सरपंच राजाराम जयवंत शेळके व त्याचा मुलगा राहुल शेळके यांचाही समावेश होता. ते सध्या तुरुंगात शिक्षा भोगत होते. करोना संसर्ग वाढल्याने त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. या काळात गावातील शेतात त्यांनी काम सुरू केले होते. त्यानुसार शेळके आज शेतात एकटेच काम करीत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. त्यामुळे हा बदला घेतल्याचा प्रकार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
माजी सरपंच राजाराम शेळके व प्रकाश कांडेकर यांच्यात राजकीय वैमनस्य होते. त्यातून एका खूनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातून प्रकाश कांडेकर याचा भाऊ, भाचा व इतर कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केलेली होती. निर्दोष सुटका झाल्यानंतर कांडेकरच्या समर्थंकांनी गावात फटाके फोडून गुलालाची उधळण केली होती. सेवा सोसायटी, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रकाश कांडेकर यांच्या पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले होते. कांडेकर याचे वाढते राजकीय वर्चस्व शेळके यांना खटकत होते. त्यामुळे लष्करात सेवेत असलेल्या एकाकडून थेट उत्तर प्रदेशमधून पिस्तूल आणून ती पुण्यातील नायर टोळीला पुरवून ही हत्या घडवून आणली होती. २०१० मध्ये ही घटना घडली होती. २०१७ मध्ये याप्रकरणी निकाल लागला व आरोपींना शिक्षा झाली. आता २०२१ मध्ये पुन्हा गावात रक्तपात झाला.