👉सोलापूरचे दामोदर पानगावकर द्वितीय; उस्मानाबादचे अनिल पाटील तृतीय क्रमांकाचे मानकरी
👉सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याहस्ते समानार्थींचा गौरव
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : ऑडिटर्स कौन्सिल ॲड वेलफेअर असोसिएशन यांच्यावतीने यावर्षीपासून राज्यस्तरीय उत्कृष्ट लेखापरीक्षक पुरस्कारांचे वितरण करण्यात येत असून, यावर्षीचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नगरचे लेखापरीक्षक पांडुरंग सूर्यभान लांडगे यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याहस्ते लांडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
समितीने केलेल्या परीक्षणातून सोलापूरचे दामोदर पानगावकर द्वितीय तर, उस्मानाबादचे अनिल पाटील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. नाशिक विभागातून द्वितीय पुरस्काराच्या मानकरी नाशिक येथील लेखापरीक्षक मनाली पाथरकर या ठरल्या असून, तृतीय क्रमांक नंदुरबार येथील लेखापरीक्षक रमेश राजपूत यांना घोषित करण्यात आला. राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या तीन पुरस्कारांसह समितीच्यावतीने राज्यात विभागनिहाय व जिल्हानिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण विभागाचे सहनिबंधक तानाजी कवडे, निवृत्त सहकार अप्पर आयुक्त एस. बी. पाटील, कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, सातारा येथील जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, उपनिबंधक संदीप जाधव, सातारा जिल्हा विशेष लेखापरीक्षक विजय सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
ऑडिटर्स कौन्सिल ॲड वेलफेअर असोसिएशनच्यावतीने कराड (जि. सातारा) येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय लेखापरीक्षक अधिवेशन व कार्यशाळेत या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. कराड अर्बन बँकेच्या सभागृहात राज्यातील सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकांसाठी दोन दिवसांचे निवासी लेखापरीक्षक अधिवेशन व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
ऑडिटर्स कौन्सिल अॅंड वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास शिर्के, उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, सचिव उमेश देवकर, सहसचिव दत्तात्रय पवार, खजिनदार संदीप नगरकर तसेच विश्वस्त संजय घोलप, श्रीकांत चौगुले व बाळासाहेब वाघ, कोल्हापूरचे विभागीय अध्यक्ष संपत शिंदे यांनी या अधिवेशनाचे नियोजनबद्ध नियोजन केले होते.
लेखापरीक्षक लांडगे यांना नाशिक विभागातील प्रथम तसेच नगर जिल्ह्याचाही प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. नाशिक विभागातील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार विजयकुमार सोनवणे यांना, तर नगर जिल्ह्यातील द्वितीय व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार अनुक्रमे बबन देशमुख व रंगनाथ पंधारे यांना देण्यात आले.
दोन दिवसांच्या या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये सहकारी संस्था व आयकर कायदा तसेच अकाऊंटिंग स्टॅंडर्ड, लेखा परिक्षणाच्या समस्या, आदर्श लेखापरीक्षण अहवाल मसुदा, घटनादुरुस्ती व सहकारी कायद्यात झालेले बदल आदी विषयांवर मंथन करण्यात आले. तसेच राज्यभरातून आलेल्या लेखापरीक्षकांना त्यावर मार्गदर्शन करण्यात आले.