संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पंढरपूर – पंढरपुरात आज रविवार (दि.१०) पहाटे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल- रुक्मणीची विधीवत महापूजा करण्यात आली.पंरपरेला अनुसरुन राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक लता शिंदे यांच्यासोबत महापूजा केली.आज (रविवार) पहाटे २.५५ मिनिटांनी विठ्ठल रखुमाई यांची शासकीय महापूजा झाली. मुख्यमंत्र्यासोबत यावेळी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील मुरली नवले व जिजाबाई मुरली नवले हे दाम्पत्य यावर्षीचे मानाचे वारकरी ठरले.
ज्ञानोबा-तुकोबांचा अखंड जयघोष, पाऊस वाऱ्याची झुळूक अन् शेकडो किलोमीटर चालून आलेल्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पहाटे आषाढीची विठ्ठल-रुक्मिणी महापूजा केली. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी पांडुरंगाला साकडे घातले.राज्यातले सर्वच लोक सुखी आणि समृध्द होवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यानी विठ्ठलाकडे केली आहे.
उभ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या भक्तीजागराला आज आषाढीच्या महापूजेने कळस चढवला. विठू माऊलीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी वारीतून पंढरीकडे धाव घेतली आहे. त्यांच्या विठ्ठल दर्शनाची आस आज पूर्ण झाली. इतक्या दिवस शांत असणाऱ्या पंढरपुरात आषाढीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.