संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
फलटण – ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ‘दर्पण’ पुरस्कार नगरमधील पत्रकार निशांत वसंत दातीर यांना उत्तर महाराष्ट्र विभागातून पुरस्कार जाहीर झाला आहे. तब्बल 22 वर्षे विविध वृत्तपत्र पत्रातून शहर प्रतिनिधी, ते आवृत्ती प्रमुख या पदावर काम पाहिले आहे. निशांत दिवाळी अंक, साप्ताहिक संत नगर टाइम्स, लोकअंकुर मध्ये संपादक म्हणून सध्या काम पाहत आहेत. कोपर्डी येथील घटनेच्या वार्तांकनाच्या वृत्तमालिकेच्या लिखाणाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार व दैनिक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते होणार आहे. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा पुरस्कार वितरण समारंभ पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’सभागृहात गुरुवार दि.6 जानेवारी 2022 रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनी स.10:30 वा. आयोजित केल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
निशांत दातीर यांना यापुर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण, नंदा फौंडेशन मुंबई, शब्दगंध साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, इंदिरा प्रतिष्ठान व अहमदनगर प्रेस क्लबचा बेस्ट रिपोर्टर असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. निशांत दातीर यांना दर्पण पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल माजी मंत्री प्रा.राम शिंदे, अण्णासाहेब डांगे, महादेव जानकर, विशेष सरकारी वकिल उज्वल निकम, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे.
‘कोरोना’ परिस्थितीमुळे सन 2019 व सन 2020 या दोन वर्षांचे पुरस्कार वितरण लांबणीवर पडले होते. यंदाच्या राज्यस्तरीय पत्रकार दिनी या पुरस्कारांचे वितरण आयोजित केले असून सध्याच्या शासन नियमानुसार केवळ 50 लोकांच्या उपस्थितीतच मर्यादित स्वरुपात हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याचे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, पोंभुर्लेग्रामस्थ व जांभेकर कुटूंबीय यांच्यावतीने प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.