संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नाशिक – विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांचे “कम्युनिटी पोलीसिंग” अंतर्गत सशक्त, सक्षम व सतर्क पोलीस अभियान उपक्रमास सुरुवात झाली आहे.
दि.१२ डिसेंबर २०२१ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील (भा.पो.से.) यांचे संकल्पनेतून नाशिक परिक्षेत्र पोलीस दलाच्या वतीने एक नवीन अभियानाच्या उपक्रमाला सुरुवात झाली. या विशेष अभियानाची मुहूर्तमेढ नाशिक ग्रामिण पोलीस दलातील बागलाण तालुक्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी वैभव असलेल्या सर्वात जास्त उंचीच्या साल्हेर किल्ला पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे समवेत किल्ला चढून रोवण्यात आली.
पोलीस दलामध्ये सतेज सतर्कपणा यावा सक्षमता यावी, पोलीसांनी त्यांचे अखंडीत असलेले कर्तव्य पार पाडतांना आरोग्य सांभाळणे हा या अभियानाचा संदेश आहे. जनतेची व समाजाची सेवा करतांना पोलीस दल सक्षम असाव, सतर्क व सबळ असावे हा या मागील उद्देश आहे.
पोलीस हा समाजाचा एक महत्वाचा तसाच जबाबदारीचा घटक आहे. सामाजिक प्रश्न, गुन्ह्यांची उकल तसेच गुन्हेगारांचा शोध व जनतेला न्याय देण्याकरीता 24 तास कार्यरत असलेल्या पोलीसास कायम सशक्त, सक्षम व सतर्क राहणे फार गरजेचे आहे. पोलीस अंमलदार सशक्त, सक्षम व सतर्क असतील तरच ते त्यांचे कार्य सचोटीने, चोखपणे पार पाडू शकतील.
अशाच प्रकारचे अभियान नाशिक परीक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, जिल्ह्यात नियमीत राबविण्यात येणार आहे.