नागरदेवळेसंबंधी निर्णय अन्यायकारक ; मंत्रिपदाचा गैरवापर करीत नगरपरिषदेचा घाट: राम पानमळकर

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-:
राहुरी नगरपालिकेत काही दिवे लावता न आलेल्या नगरविकास राज्यमंत्र्यांचा नागरदेवळे नगरपरिषद करण्यासाठी एवढा अट्टहास का ? राहुरी नगरपालिकेची अवस्था नागरदेवळेपेक्षा वाईट असताना केवळ राजकीय स्वार्थापायी नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी येथील नागरिकांना वाढीव कराच्या खाईत लोटले आहे. नागरिकांची मते विचारात न घेता मंत्रीपदाचा गैरवापर करत नगरपरिषदेचा घाट घातला, असा आरोप नागरदेवळ्याचे माजी सरपंच राम पानमळकर यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर केला.


पानमळकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी आमदार निधी, २५/१५ चा निधी तसेच इतर माध्यमातून वरील तीनही ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे रस्ते, ड्रेनेज, वीजपुरवठा, बुन्हऱ्हाणनगर पाणीपुरवठा योजनेतून ४४ गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध झाली वरील तीनही गावची वस्तीही वाढत म्हणून चालली आहे. काही वर्षापुर्वी बुरूडगावचा समावेश महापालिकेत केला होता. परंतु विकास कामांकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे स्थानिकांच्या प्रचंड विरोधामुळे तिथे पुन्हा ग्रामपंचायत स्थापित करावी लागली होती. हे उदाहरण सर्वांच्यासमोर असताना येथील नागरिकांच्या वैयक्तिक मताची मुस्कटदाबी मंत्री तनपुरे यांनी केली आहे. याचा जाब येथील जनता मंत्र्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही, असे पानळकर यांनी म्हटले. येत्या काळात तीनही ग्रामपंचायतीमधील नागरिकांशी चर्चा करून पुढे कोणती दिशा घ्यायची याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. या तिनही ग्रामपंचायतीवर कर्डिले यांचे निर्विवाद वर्चस्व असून जरी नगरपरिषद झाली व निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली तरीही या नगरपरिषदेवर कर्डिले यांच्याच नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता येणार हे सांगायला कुणा भविष्यकाराची गरज नाही, असेही ते म्हणाले.
नगरपरिषदेकरिता ५ कोटी जाहीर करणाऱ्या मंत्र्यांनी निवडणुकीनंतर मात्र जनतेला वाऱ्यावर – सोडू नये असा सवाल पानमळकर यांनी केला.

👉ग्रामसभांच्या ठरावाला केराची टोपली
नागरदेवळ्यासह तीनही ग्रामसभांच्या नगरपरिषद विरोधी ठरावाला नगरविकास खात्याकडून केराची टोपली दाखविली आहे. नगरपरिषदेकरिता नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या. त्या हरकतीवर कुठलेही स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडून हकरतदारांना अदयापपर्यंत प्राप्त झालेले नाही. तीनही गावच्या नागरिकांनी ग्रामसभेत नगरपरिषद बाबतचा ठराव बहुमताने फेटाळून नगरपरिषदेला विरोध केला असतानाही या ठरावांना खुद्द नगरविकास मंत्र्यांनी केराची टोपली दाखवून नागरिकांच्या मतांचे अवमूल्यन केले आहे, असे ग्रामपंचायत सदस्य रोहित भुजबळ यांनी सांगितले.

👉नागरीकरणाचा हेतू काय ?
नगरपरिषद म्हणजे गावाचे शहरीकरण असे असताना या तीनही गावच्या एकूण २०३३.४० हेक्टर आर एवढया क्षेत्रफळांपैकी बिगरशेती क्षेत्र फक्त १७२.७८ हेक्टर आर एवढे आहे. शेतजमीन क्षेत्रफळ हे १८६०.७१ हेक्टर आर एवढे आहे. येथील अनेकांचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन शेती हेच आहे. या भागाचे नागरीकरण करण्याचा हेतू काय आहे, हे नगरविकास मंत्र्यांच्या निर्णयातून स्पष्ट होत नाही. केवळ काही बगलबच्च्यांना खुश करणे व राजकीय सुडापोटी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप वडारवाडीचे उपसरपंच महादेव डोकडे यांनी केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!