संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवीदिल्ली- जागतिक आरोग्य संघटनेच्या ( डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी कोविड-19 च्या नवीन व्हेरिएंटबाबत म्हटले आहे की, भारतातील कोरोनाचे स्वरूप समजून घेण्यासाठी हा ‘वेक अप कॉल’ असू शकतो. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत स्वामीनाथन यांनी सर्व संभाव्य खबरदारी आणि मास्क घालण्याच्या गरजेवर भर दिला आहे.
मास्क हेच कोरोनाविरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र आहे. डब्ल्यूएचओचे शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, कोविड-19 च्या नवीन व्हेरिएंटविरूद्ध मास्क हे सर्वात मोठे शस्त्र आहे. मास्क ही खिशात ठेवलेली लस आहे जी तुम्हाला कोरोनापासून वाचवेल. त्यामुळे मास्क घाला. गर्दीत जाणे टाळा याशिवाय, डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञाने नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन विरुद्धच्या युद्धात प्रौढांचे लसीकरण, मोठ्या संख्येने एकत्र येण्यापासून दूर राहणे आणि प्रकरणांमध्ये असामान्य वाढ यावर बारीक लक्ष ठेवणे यासारख्या सूचना केल्या आहेत.
स्वामिनाथन म्हणाल्या – हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य असू शकतो. अद्याप अधिकृतपणे काहीही सांगता येत नसले तरी. काही दिवसांत याबाबत अधिक माहिती मिळेल. ओमिक्रॉनच्या इतर कोविड व्हेरिएंटशी केलेल्या तुलनेबद्दल स्वामीनाथन म्हणाल्या की नवीन व्हेरिएंटबद्दल अचूक माहिती मिळविण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.
ओमिक्रॉनला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ श्रेणीत ठेवले
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने जग ढवळून निघाले आहे. नवीन व्हेरिएंट डेल्टापेक्षाही धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. WHO ने या प्रकाराला ‘व्हेरिएंट ऑफ कंसर्न’ या श्रेणीत ठेवले आहे. जेव्हा विषाणूचा एक व्हेरिएंट ओळखला जातो, तेव्हा WHO त्या व्हेरिएंटबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी त्याचे निरीक्षण करते. निरीक्षणासाठी, व्हायरसला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट श्रेणीमध्ये ठेवले जाते. विषाणूच्या अभ्यासात असे आढळून आले की, हा व्हेरिएंट झपाट्याने पसरत आहे आणि तो खूप संक्रामक आहे, तर त्याला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ या श्रेणीत टाकले जाते.