नगर महापालिकेच्या आरोग्य ठेक्यावर आक्षेप ; आरोग्य सेवेत हलगर्जीपणा

मजुरांच्या पैश्यांवर ठेकेदारांचा डोळा ; पण खरा सूत्रधार कोण ?
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर : महापालिकाने एक महिन्यासाठी नाले सफाईचा ठेका दिला असतांना तीन महिन्यांपर्यंत हा ठेका चालवला जातो. मजुरांना दिलेल्या मजुरीत तफावत आढळून येते.मजूर संख्येतही तफावत दिसून येते.सर्वात जास्त तक्रारी असतांनाहि मनपा पुण्याच्या स्वयंभू संस्थेवर का मेहेरबान होते,याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कागद,काच,पत्रा वेचक संघटनेने केली असून या प्रकरणी कारवाई न झाल्यास तळतळाट आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
स्वच्छ शहर ,हरित शहर… अश्या विविध घोष वाक्यांनी नगरमधील भिंती रंगवल्या जातात. मात्र आरोग्य सेवा चोख दिली जाते का असा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिली जाणारी रोजंदारी आणि प्रत्यक्ष दाखवली जाणारी रोजंदारी यात तफावत दिसते. प्रत्यक्ष कामावर असणारे मजूर आणि हजेरी पुस्तकावरील संख्या यातही फरक असतो. मजुरांच्या पैश्यावर ठेकेदारांचा डोळा आहे. असे मानल्यास त्याचा मनपातील खरा सूत्रधार कोण ?असा प्रश्न पडतो.आरोग्य सेवेत मूलभूत क्रांती हवी अशी अपेक्षा व्यक्त होतांना नगर महापालिकेत मात्र ही सेवा कमकुवत करण्याचा आणि ठेक्याच्या माध्यमातून पैसे कमविण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार होत आहे. म्हणूनच वरील मुद्यांचा खुलासा होणे गरजेचे वाटते.
शहरातील साफसफाई व नाले सफाईच्या कामांचा मजुरांचा ठेका स्वयंभू ट्रान्सपोर्ट, पुणे यांना ३० दिवसांसाठी देण्यात आला होता. त्यात प्रत्येक मजुराला दिवसाकाठी ५४५ रु.याप्रमाणे मजुरी देण्याचा करार करण्यात आला.एक महिन्याचा ठेका परंतु प्रत्यक्षात हा ठेका ३ महिने (जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर २०२०) पर्यंत कार्यरत होता.ठेकेदाराने मजुरांची दाखवलेली संख्या आणि प्रत्यक्ष कामावर असणाऱ्या संख्येत तफावत आढळून आलेली आहे.तसेच मजुरांना प्रत्यक्षात देण्यात आलेल्या मजुरीतही फरक असल्याचे दिसते.मजुरांना दरडोई दरदिवशी केवळ २००तर काहीना ३०० रु. याप्रमाणे मजुरी दिली असून कागदोपत्री मात्र ५४५ रु, इतकी दाखवण्यात आली आहे.हजेरी पुस्तकामध्ये कर्मचाऱ्यांची नावे व त्यांच्या सह्या पाहता त्या सर्व संशयास्पद असल्याचे दिसते. अनेक मजुरांकडे चौकशी केली असता रोजंदारी २००-३०० असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी जुलै २०२० या महिन्यात २३९८ कामगारांच्या मजुरीपोटी १३ लाख ६ हजार ९१० रु.,ऑगस्ट २०२० मध्ये ११११ कर्मचाऱ्यांच्या मजुरीपोटी ६ लाख ५हजार ४९५ रु. तर सप्टेंबर २०२० मध्ये ६१ कामगारांच्या रोजंदारीपोटी ३३ हजार २४५ रु. असे एकूण १९ लाख ४५ हजार ६५० रु.चे बिल त्यात २ टक्के आयकर समाविष्ट करून ठेकेदाराने दि.०९/०९/२०२० रोजी मनपात सादर केले. या बिलावर त्याच दिवशी संबंधित अधिकारी, लेखापाल आणि आयुक्तांच्या स्वक्ष-या होऊन तातडीने बिल अदा करण्यात आले .
ज्या ठेकेदाराच्या कचऱ्याच्या वजनात तफावत,बीफ वर बंदी असतांना देखील त्याच्या टाकाऊ मालाचे वजन कचऱ्यात धरले जाते, एक महिन्याचा ठेका ३ महिन्यांपर्यंत चालवला जातो, स्वच्छता अभियानच्या सर्वेक्षणात ज्या कचरा वेचकांच्या जीवावर १५ गुण मिळवले जातात त्याच मजुरांना कमी मजुरी दिली जाते, शिवाय त्यांच्या संख्येतही तफावत दिसते, इतके सगळे होऊनही मनपा या ठेकेदार संस्थेवर मेहेरबान का? असा प्रश्न पडतो.
यासर्व प्रकरणाची चौकशी होऊन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी नगर येथील कागद, काच, पत्रा वेचक संघटनेने केली आहे. १५ दिवसात संबंधितांवर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तळतळाट आंदोलन केले जाईल असे संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे यांनी सांगितले.

संकलन : राजेंद्र सटाणकर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!