संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मागील काही दिवसांपासून देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याची पाहायला मिळाली. पण आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. देशातील मृत्यूच्या संख्येत देखील चढउतार होत आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती आणखीन नियंत्रणात आणण्यासाठी कंटेनमेंट झोनची नियमावली ३० जूनपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. तसेच यासंदर्भात गृह मंत्रालयाकडून राज्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेली नियमावली ३० जूनपर्यंत कायम राहिले, असे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. केंद्राने राज्य सरकारला सांगितले आहे की, ‘ज्या जिल्ह्यात अधिक कोरोनाबाधित आहेत, त्या ठिकाणी स्थानिक स्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयायोजना सूनिश्चित करा. कठोरपणे निर्बंध लागू केल्यामुळे दक्षिण आणि ईशान्यच्या काही भागांना सोडून संपूर्ण भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे.’
यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात गेल्या २० दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याचे सांगितले. ७ मे २०२१ रोजी नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येने सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर आता देशातील नव्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत आहे. १५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोनाची दररोजची रुग्णसंख्या १ हजार ते ५ हजार दरम्यान आहे. तर १३ राज्यात दररोज १ हजार पेक्षा कमी नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होते. तसेच मागील आठवड्यात २४ राज्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज २५ राज्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या एका दिवसातील नवीन रुग्णसंख्येपेक्षा कमी आहे.