तिप्पट करवाढीच्या प्रस्तावा विरोधात काँग्रेस १ लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविणार – किरण काळे

करवाढीला विरोध न करणाऱ्या आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवकांच्या दारावर काँग्रेस निषेध पत्रके चिकटविणार –

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात आर्थिक नियोजन शून्यतेमुळे मनपा सत्ताधार्‍यांनी मनपाची पुरती वाट लावली आहे. दिवाळखोरीमुळे महापालिकेला कंगाल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी तिप्पट करवाढीचा घाट घातला आहे. तिप्पट करवाढीचा प्रस्ताव मागे न घेतल्यास कोरोनामुळे आधीच पिचलेल्या सामान्य नगरकरांना वेठीस धरण्यासाठी मनपा सत्ताधारी आणि शहराच्या लोकप्रतिनिधींच्या या तुघलकी प्रस्तावा विरोधात काँग्रेसच्या वतीने घरोघरी जात नगर शहरात १ लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविणार असल्याची घोषणा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. 
येत्या गुरुवारी मनपाच्या ऑनलाइन महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेमध्ये एक, दोन नव्हे तर तब्बल तिप्पट करवाढीचा घाट मनपाने घातला आहे. या विरोधात काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली असून करवाढीच्या मुद्द्यावरून नागरिकांच्या वतीने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सदर तिप्पट करवाढ रद्द करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन काँग्रेसच्या वतीने मनपा आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. 
याबाबत गंभीर आरोप करताना जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षांपासून नागरिकांना मोठ्या संकटातून जावे लागत आहे. सततच्या लॉकडाउनच्या कडक निर्बंधांमुळे शहरातील व्यावसायिक, व्यापारी, हातगाडीवाले, फेरीवाले, नोकरदार, उद्योजक, मोलकरणी, कामगार, रिक्षावाले, हातावर पोट भरणारे अशा सर्वच घटकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मध्यमवर्गीय, गोरगरीब, धनिक अशा सगळ्यांचीच आर्थिक स्थिती हालाखीची आहे. ही वस्तुस्थिती माहिती असताना सुद्धा मनपा प्रशासनाच्या आडून तिप्पट करवाढीचा प्रस्ताव महासभेत सत्ताधाऱ्यांकडून ठेवलाच कसा जातो, असा सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.  
आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवकांच्या दारावर चिकटविणार निषेधाची पत्रके :नगर शहराच्या विकासासाठी एकत्र आल्याच्या वल्गना सातत्यानं शहरात काही पुढारी करत असतात. विकासासाठी नव्हे तर वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी एकत्र येणाऱ्या या पुढाऱ्यांनी स्वतःच्या राजकारणासाठी सर्वसामान्य नगरकरांना वेठीस धरण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. या पुढार्‍यांचे कार्यकर्ते असणाऱ्या ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठी मनपाकडे पैसे उरले नसल्यामुळे आता यांना करवाढ करून सामान्य नगरकरांच्या खिशातून पैसे काढत ठेकेदारांच्या घशात घालायचे असून यातून त्यांना टक्केवारी गोळा करायची आहे. काँग्रेसचा याला तीव्र विरोध असून मनपा पदाधिकारी, नगरसेवक आणि मनपा सत्तेचे नेतृत्व करणारे शहराचे आमदार यांनी तिप्पट करवाढीच्या प्रस्तावास विरोध करत तो रद्द करावा. अन्यथा या प्रस्तावास विरोध न करणाऱ्या शहराचे आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवकांच्या दारावर नागरिकांच्या वतीने काँग्रेस निषेधाची पत्रके चिकटविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केले आहे. 
प्रत्येक प्रभागात नागरिकांच्या बैठका घेणार :मनपाने तिप्पट करवाढीचा प्रस्ताव रद्द न केल्यास काँग्रेसच्या वतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये नागरिकांच्या बैठका घेऊन करवाढीला विरोध केला जाईल. मनपाच्या या तुघलकी निर्णयाविरोधात नागरिक, व्यापारी, उद्योजक यांच्यामध्ये जनजागृती केली जाईल. तसेच या बैठकांच्या माध्यमातून शहरातील एक लाख नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहीम राबविली जाणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 
विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांबरोबर, काँग्रेस मात्र सामान्य नागरिकांबरोबर :नगर शहरामध्ये मनपा सत्ताधारी आणि विरोधक एक झाले आहेत. मनपात आता विरोधक असणारे भाजप मागील अडीच वर्ष राष्ट्रवादी बरोबर सत्तेत होते. त्यावेळी मनपातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असणाऱ्या शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद न देता ते राष्ट्रवादीने स्वतःकडे ठेवले होते. राष्ट्रवादीने सत्ता बदलाच्या चर्चेत भाजपाला विरोधी पक्षनेते पदाचा शब्द दिला असून शहरातील सोयरे-धायरे आता विरोधी पक्षनेते पदाचे नाव निश्चित करणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करीत ही सोयऱ्या-धायऱ्याची नुरा कुस्ती सुरू असल्याने आज काँग्रेस सोडून तिप्पट करवाढी विरोधात कोणताही प्रमुख पक्ष भूमिका घेत पुढे आलेला नाही. काँग्रेस हाच नगरकरांच्या हक्कांसाठी लढणारा आणि त्यांच्या मनातला खरा विरोधी पक्ष आहे. सामान्य नगरकरांचे करवाढ करून कंबरडे मोडले जात असताना शहराच्या आमदारांनी मात्र मूग गिळून गप्प बसणे पसंत केले आहे, अशी टीका जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली असून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यां बरोबर असला तरी काँग्रेस मात्र सर्वसामान्य नागरिक आणि नगरकरांबरोबर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!