जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्यासाठी संघटीत प्रयत्नांची गरज – विनायक देशमुख

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्यासाठी संघटीत प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व अ.भा.काँग्रेसचे सदस्य विनायकराव देशमुख यांनी केले.
शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन कार्यक्रमात श्री. देशमुख बोलत होते. प्रारंभी श्री.देशमुख यांच्या हस्ते श्री. भुजबळ यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्वश्री मुन्नाशेठ चमडेवाला, फिरोज शफी खान, बाळासाहेब भंडारी, अनिल परदेशी, शाम वाघस्कर, एम.आय.शेख, मुकुल देशमुख, अभिजित कांबळे, नरेंद्र भिंगारदिवे, श्रीमती रजनी ताठे, राजेश सटाणकर, राजेश बाठिया आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री.देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील नेत्यांना काँग्रेस संघटना बळकट करण्यासाठी व्यापक भुमिका घ्यावी लागेल. ‘हा गटाचा, तो त्या गटाचा’ असा विचार न करता सर्वांना बरोबर घेऊन पक्ष विस्तार करावा लागेल. राज्य पातळीवर प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व राज्य प्रभारी एच.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाने पक्ष विस्ताराचे व पक्षापासून दुरावलेल्यांना एकत्र करण्याचे काम सुरु आहे. येत्या शनिवारी माजी मंत्री आ.डॉ.सुनिल देशमुख (अमरावती) हे पक्षात प्रवेश करणार आहेत. जिल्ह्यातीलही अशा दुरावलेल्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून, उद्या या संदर्भात प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले व प्रभारी आ.एच.के.पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.
यावेळी बोलताना शहर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी म्हणाले, सध्या मी आणि माझ्या भोवतीची चार माणसे अशा भ्रमात काही मंडळी पक्ष चालविण्याचा प्रयत्न करतात. शहरात पक्ष वाढविण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी वीस-पंचवीस वर्षे कार्य केले, त्यांना दूर करण्याचे व त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम सध्या सुरु आहे. श्री.देशमुख यांनी याबाबतची वस्तुस्थिती प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्यापर्यंत पोहचवावी. सध्या राज्यातील सरकार व संघटनेतील महत्वाची पदे जिल्ह्यातील नेत्यांकडे आहेत. मात्र शहर काँग्रेसचे व जिल्हा काँग्रेसचे कार्यालय अस्तित्वात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
सत्काराला उत्तर देतांना बाळासाहेब भुजबळ म्हणाले, मी पदावर नसतांनाही आपण माझा सत्कार करुन माझ्यावर प्रेम व्यक्त केले, त्याबद्दल मी आभारी आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने शहरात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी मी सदैव कटीबद्ध राहणार आहे.
सूत्रसंचालन शाम वाघस्कर यांनी केले तर आभार अभिजीत कांबळे यांनी मानले.

संकलन : राजेंद्र सटणाकर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!