जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथे राष्ट्रीय लोक अदालत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, अहमदनगर बार असोशिएशन, अहमदनगर आणि सेंट्रल बार असोशिएशन, अहमदनगर यांचे संयुक्त विदयमाने शनिवार दि.९ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे करण्यात आले. सदर राष्ट्रीय लोक अदालतीचा उद्घाटन समारंभ जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे संपन्न झाला. राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन रोपट्यास पाणी घालून पक्षकार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा हे होते. कार्यक्रमांस जिल्हा सरकारी वकिल ॲड. सतिष पाटील, अहमदनगर बार असोशिएशन अध्यक्ष, ॲड. संजय पाटील, ॲड. फारूख शेख, उपाध्यक्ष, सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर व प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, डॉ. साहेबराव डावरे, डॉ. सचिन बांगर, उपायुक्त तथा मुल्यनिर्धारक कर संकलन अधिकारी, महानगरपालीका अहमदनगर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर सुधाकर यार्लगड्डा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जीवन एक तडजोड आहे, प्रत्येकाने आयुष्यात तडजोड केली पाहीजे, तसेच जास्तीत जास्त प्रकरणे आप आपसांत तडजोड करुन मिटविले पाहिजेत असे सांगितले. पुढे ते असेही म्हणाले की, लोकअदालतमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विजवितरण, एस. टी. महामंडळ, बँका, पतसंस्था, विमा कंपन्या सहभागी होत असतात त्यामुळे लोकअदालत हा एक महायज्ञ असून त्यामध्ये प्रत्येकाने आप-आपले योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव, श्रीमती, भाग्यश्री का. पाटील यांनी केली. समाजातील वंचित, उपेक्षीत व दुर्बल घटकांना न्याय मिळणेकरीता लोक अदालत हे प्रभावी माध्यम आहे असे त्यांनी आपल्या प्रस्तावनेत नमूद केले. लोकअदालतीचा पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा , असे आवाहन केले.
कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उपक्रमात सहाभागी होणा-या विधीज्ञांचा गौरव कृतज्ञता पत्र व रोपटे देवून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें. यार्लगड्डा यांच्या हस्ते करण्यात आला. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयांतील दिवाणी व फौजदारी प्रकरणे, धनादेश, चेक संदर्भातील प्रकरणे, बँकेची कर्ज वसूली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार न्यायालयांतील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज महावितरणाची समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयांत येण्याअगोदरची दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली होती.
जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटनाच्या वेळी सुधाकर वें. यार्लगड्डा, अध्यक्ष, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, अहमदनगर, एस. एस. गोसावी, जिल्हा न्यायाधीश-१, श्रीमती भाग्यश्री का. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इतर माननीय न्यायीक अधिकारी उपस्थित होते.
ॲड. विक्रम वाडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ॲड. फारुख शेख यांनी आभार प्रदर्शन केले. लोकअदालत यशस्वी करणेकामी दोन्ही बारचे सदस्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.