जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाकरीता शासन कटिबद्ध : पालकमंत्री हसन मुश्रीफ


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर :-
आपला जिल्हा कृषी, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करत असून, जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परेड ग्राऊंड येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले त्यावेळी श्री. मुश्रीफ बोलत होते.

या समारंभात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, महानगर पालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हयातील स्वांतत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.


पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, गेल्या आर्थिक वर्षाअखेर जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 अंतर्गत अहमदनगर जिल्ह्याकरीता शासनाकडून रु. 510 कोटीचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी 100 टक्के निधी खर्च झाला आहे. जिल्हा नियोजन समितीने मागील काही वर्षात सातत्याने 100 टक्के निधी खर्च करण्याचा नावलौकिक कायम ठेवला आहे. शासनाचे ऑनलाईन बिम्स प्रणालीवर उपलब्ध खर्च आकडेवारी व एकूण अर्थसंकल्पित निधीच्या तुलनेत राज्यात अहमदनगर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये प्रामुख्याने कोविड -19 उपाययोजने अंतर्गत जिल्हास्तरीय आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण, ग्रामपंचायतींना जनसुविधा, ग्रामीण रस्ते विकास, शाळा खोल्या बांधकाम/दुरूस्ती, अंगणवाड्या बांधकाम, नागरी क्षेत्र विकास, अग्निशमन, विद्युत व्यवस्था बळकटीकरण, यात्रास्थळ विकास इत्यादी क्षेत्रांकरीता निधीचा वापर करण्यात आला. 100 टक्के खर्चाचे उद्दिष्ट साध्य केले हे उल्लेखनीय आहे.
अहमदनगर महानगरपालिकेस सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी महाराष्‍ट्र सुवर्णजयंती नगरोत्‍थान महाअभियान (जिल्‍हास्‍तर) योजनेअंतर्गत आहुराणा बुद्रुक येथे गोरगरीब रुग्‍णांसाठी अद्ययावत सुसज्‍ज नविन हॉस्पिटल बांधणेसाठी 11 कोटी 50 लाख रूपये व माळीवाडा येथे खेळाचे मैदान विकसित करणेसाठी 3 कोटी 90 लाख रूपयांचा अतिरिक्‍त निधी तसेच नाविण्‍यपूर्ण योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 4 मधील बुरुडगांव रोड येथील साईनगर उद्यानामध्‍ये म्‍युझिकल गार्डन विकसित करणेसाठी 1 कोटी 22 लाख रूपयांचा निधी व साहित्‍यरत्‍न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्‍ती सुधारणा योजनेंतर्गत मंजूर 10 कोटी 2 लाखांच्या निधीव्‍यतिरिक्‍त आणखी 6 कोटी 12 लाखांचा अतिरिक्‍त निधी उपलब्‍ध करून दिला आहे.
कोविड – 19 रिलीफ फंड अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील नोंदित कामगार व बांधकाम कामगारांना एकुण 9 कोटी 28 लाख रुपये कामगारांच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे थेट वर्ग करण्‍यात आले आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षात अवकाळी पाऊस, अतिवृष्‍टी, पूर, तौक्‍ते चक्रीवादळ इत्‍यादींमुळे शेती पिकांचे व इतर नुकसानी बद्दल जिल्‍ह्यात 65 कोटी 80 लाखांचे इतके अनुदान शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत उपेक्षित व वंचित घटकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. वसतिगृहाबाहेर राहून शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो. भूमीहीन अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेच्या माध्यमातून कसायला जमीन उपलब्ध करून दिली जाते. स्वत:चे हक्काचे घरकुल बांधण्यासाठी रमाई आवास घरकुल योजनेत अर्थसहाय्य दिले जाते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी या योजनेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती देण्यात येते. स्टँड अप योजनेत अनुसूचित जातीच्या उद्योजकांना अर्थसहाय्य देण्यात येते. मागासवर्गीय बचतगटांना शेती कामांसाठी 3 लाख 15 हजार रूपयांच्या अनुदानातून मिनी ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात येत असते. जिल्ह्यातील मुला-मुलींना 18 शासकीय वसतीगृहाच्या माध्यमातून निवास व भोजनांची मोफत व्यवस्था करण्यात येते. राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळते. या योजनांचा सर्व गरजु व्यक्ती व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांनी कोरोनाच्या पाहिल्या, दूसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत योग्य नियोजन व उपाययोजना करत आपल्या जीवाची परवा न करता अहोरात्र काम करत कोरोनाचे महासंकट नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी ठरले आहे. परंतू सद्या या महासकंटाची तीव्रता कमी असली तरी आपणांस सदैव जागरुक राहावे लागणार आहे. जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत पहिला आणि दूसरा डोस घेतलेला नाही. तरी त्यांना याप्रसंगी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे.
मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्ह्यात पोलीसदलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस उप अधिक्षक संदीप बाबुराव मिटके, सहायक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कृष्णजी ढवळे, पोलीस नाईक श्रीमती माधुरी साहेबराव तोडमल, पोलीस नाईक दिपक भास्कर घाटकर, अहमदनगर यांना पोलीस महासंचालक पदक देवून तर जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार 2022 रमेश किसन झेंडे यांना प्रशस्तीपत्रक देऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अमृत जवान सन्मान अभियान 2022 अंतर्गत श्रीमती स्वाती हंडारे यांना 30 टक्के आरक्षण प्रमाणपत्र तर संतोष दत्तात्रय मगर यांना आर्थिक दृष्टष्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्राचे पालकमंत्री यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यानंतर सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या माहितीपर प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या माहितीपर प्रदर्शनाची पालकमंत्र्यांनी यावेळी पहाणी केली व माहिती जाणून घेतली. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी पालकमंत्री यांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी पोलीस दलातर्फे मानवंदना स्विकारुन पोलीस परेडचे निरिक्षण केले. या परेड संचलनात पुरुष, महिला पोलीस पथक, होमगार्ड, पोलीस बँड पथक आदी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!