संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
जामखेड – पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरु केलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील १५ गावांतील पाणी पुरवठा योजनांकरीता १८ कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजुर झाला असल्याची माहीती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.
यासंदर्भात खा.डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला नळाव्दारे पाणी मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने जलजिवन मिशन सुरु केले आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांना बळकटी देण्याचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे. प्रतिदिन एका व्यक्तिला ५५ लिटर पाणी मिळावे याकरीता प्रत्येक गावात नवीन पाणी पुरवठा योजना सुरु करणे अथवा जुण्या पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्ती करीता राज्य सरकारच्या हिश्यासह या निधीची उपलब्धता केंद्र सरकारने करुन दिली आहे.
जामखेड तालुक्यातील १५ गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा प्रस्ताव जलजिवन मिशन अंतर्गत सादर करण्यात आला होता. या सर्व योजनांच्या प्रस्तावास केंद्र शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने निधी उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
जामखेड तालुक्यातील एकुण १५ योजनांसाठी १८ कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजुर झाला असून यामध्ये मौजे वाकी गावासाठी १ कोटी २३ लाख, सावरगाव ९४ लाख ५७ हजार, फक्राबाद १ कोटी ३० लाख, मोहरी ९२ लाख ३७ हजार, धनेगाव ८१ लाख ३ हजार, नाहुली ८० लाख ७५ हजार, सरदवाडी ८८ लाख ८६ हजार, सोनेगाव ८२ लाख ९० हजार, राजुरी १ कोटी ७ लाख, हसनाबाद १ कोटी ४२ लाख, शिऊर १ कोटी ९७ लाख, मोहा १ कोटी ६७ लाख, जातेगाव १ कोटी २३ लाख, साकत १ कोटी ९७ लाख, करपडी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.
तालुक्यातील या पाणी योजनांसाठी १८ कोटी १७ लाख ५६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने या लवकर या पाणी योजनांची कामे सुरु होतील असा विश्वास खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील पाणी प्रश्नासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या जल जिवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात या योजनांमुळे होणार आहे.