संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : जन्मदात्यानेच स्वत:च्या मुलाचा खून करणा-या आरोपी बापास जन्मठेप न्यायालयाने सुनावली आहे. आरोपी गोरख उर्फ गोरक्षनाथ किसन कर्पे, (वय ४५, रा. आखेगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) याने स्वतःच्या मुलास जीवे ठार मारल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश क्र. ९ बी. एम. पाटील यांनी आरोपीस भा.द.वि.का. कलम ३०२ अन्वये दोषी धरून जन्मठेप व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील अर्जुन बी. पवार यांनी कामकाज पाहिले.
याबाबत घटनेची माहिती अशी कि, दि. २९ मार्च २०२१ रोजी फिर्यादी ही संध्याकाळी ६ वा.च्या सुमारास शेतातून काम करून घरी आली त्यावेळी तिचा मुलगा ( मयत) सोमनाथ व फिर्यादीचा पती आरोपी गोरख कर्पे हे दोघेच घरी होते. आरोपी गोरख कर्पे हा दारू प्याऊन घरी आला. त्यावेळी फिर्यादीने त्यास, “ आज होळीचा सण असून तुम्ही सणासुदीच्या दिवशी दारू का पिवुन आला?” असे विचारले असता आरोपीला त्याचा राग आला व तो फिर्यादीला मारण्यासाठी पुढे आला असता फिर्यादीचा मुलगा ( मयत) सोमनाथ हा मध्ये आल्याने आरोपीने त्याला शिवीगाळ केली व घरातुन निघुन गेला. त्यानंतर फिर्यादी व तिचा मुलगा ( मयत) सोमनाथ यांनी रात्री जेवण करून १० वाजता त्यांच्या आखेगाव शिवारातील शेतीतील उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले. मुलगा (मयत) सोमनाथ हा उसाला पाणी देत होता व फिर्यादी ही उसाच्या शेवटच्या टोकाला पाणी पाणी पोहचल्यावर तसे त्याला आवाज देऊन सांगत होती. त्या दोघांच्या दरम्यान साधारण १०० फुटांचे अंतर होते. शेताला पाणी देत असताना दि.३० मार्च २०२१ रोजी पहाटे ३:३० वा. च्या सुमारास मुलगा ( मयत) सोमनाथ याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी त्याच्याकडे पळत गेली तेंव्हा तिने तिचा पती आरोपी गोरख किसन कर्पे हा लोखंडी गजाने सोमनाथच्या डोक्यात मारत होता व सोमनाथ हा त्यांच्या व एकनाथ पायघन यांच्या शेतातील बांधावर खाली पडल्याचे तिला दिसले. त्यावेळी सोमनाथ हा गंभीर जखमी झालेला असून त्याच्या डोक्यातून रक्त येत होते व तो काहीही बोलत नव्हता. त्याच्या शरीराची थोडी हालचाल चालू होती. फिर्यादीस पाहून आरोपी गोरख हो तेथून निघून गेला त्यावेळी त्याच्या हातात लोखंडी गज होता. सोमनाथचा आवाज ऐकुन शेजारच्या शेतात पाणी देत असलेली फिर्यादीची जाव मुक्ता करपे व अंबादास शिवाराम जाधव, सतिश काकासाहेब पायघन हे तेथे आले. त्यांनी सोमनाथ याला उपचारासाठी गाडीमध्ये शेवगाव येथील डॉ. बोडके यांच्या दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला दवाखान्यात दाखल करून न घेता अहमदनगर येथील दवाखान्यात घेवून जाण्यास सांगितले. त्यानुसार सोमनाथ यास अहमदनगर येथील मॅककेअर दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान सोमनाथ याचा मृत्यु झाला. सदर घटनेबाबत फिर्यादीने शेवगाव पोलीस स्टेशनला आरोपीविरूध्द फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपीविरूध्द भा.द.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पो. उप निरी. सोपान गोरे यांनी करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटला हा जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ९ बी. एम. पाटील यांचे न्यायालयात चालला. सरकार पक्षाच्या वतीने एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, मयतावर उपचार करणारे मॅक्सकेअर हॉस्पिटलचे डॉ. मोहम्मद माजीद, शवविच्छेदन करणारे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत सायगावकर, साक्षीदर सतिश पायघन, पंच साक्षीदार शिवाजी बोरुडे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. तसेच आरोपीने त्याच्या बचावासाठी न्यायालयात शपथेवर जबाब दिला होता. सदरची घटना ही दि. ३० मार्च २०२१ रोजी घडलेली होती. या घटनेचा निकाल हा गुरुवारी (दि.२१) रोजी लागलेला असून तपासासह संपूर्ण केसचे कामकाज हे १ वर्ष २२ दिवसात पूर्ण झाले. खटला हा जिल्हा न्यायालयात जलदगतीने चालविण्यात आला. या खटल्यामध्ये अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अर्जुन बी. पवार यांनी केलेला युक्तिवाद व न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. खटल्यामध्ये अति. सरकारी अभियोक्ता अर्जुन बी. पवार यांनी कामकाज पाहिले. त्यांना कामकाजा दरम्यान पैरवी अधिकारी सहा फौजदार महेश जोशी व शेवगाव पोलीस ठाण्याचे पो. कॉ. सचिन खेडकर यांनी सहकार्य केले.