कोरोनामुक्त गावासाठी जागरुकता निर्माण करा ; आशा सेविकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन


👉कोरोनाकाळातील कामाबद्दल आशा सेविकांना मुख्यमंत्र्यांकडून मानाचा मुजरा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी ‘आशा’ सेविकांची भूमिका महत्वाची आहे. पालकांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करतानाच कोरोनामुक्त गावासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. गावातील वस्तीची जबाबदारी घेऊन कोरोनामुक्तीसाठी त्यांना मार्गदर्शन करा, असे आवाहन करतानाच आशा सेविकांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली.
मुलांमधील कोरोना संसर्ग आणि आशा सेविकांची जबाबदारी या विषयावर बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सच्या सदस्यांनी आशा सेविकांशी संवाद साधला. दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, बालरोग तज्ञांच्या टास्फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, डॉ. विजय येवले, डॉ. समीर दलवाई, डॉ. आरती किणीकर यांच्यासह राज्यभरातील सुमारे ७० हजार आशा सेविका या ऑनलाईन परिषदेत सहभागी झाले होते.
👉बालरोग तज्ञांच्या टास्कफोर्सने ज्या सूचना केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करतानाच कोरोना व्यतिरिक्त एखाद्या आजाराची साथ, लक्षणे आढळल्यास त्याची तातडीने माहिती प्रशासकीय यंत्रणेला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशा सेविकांना केले. बालकांची काळजी घेण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करावे त्यांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करण्याचे काम आशा सेविकांनी करावे. कुटुंबातील सदस्यांच्या माध्यमातूनच बालकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबत नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
👉कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे
कोरोना व्यतिरिक्तही कुपोषणाचे संकट आहे त्याला सामोरे जाताना कुपोषणामुळे बालमृत्यू होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाच्या कोरोना मुक्त गाव मोहिमेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा. गावातील वाड्या वस्त्यांची जबाबदार घेऊन त्यांना कोरोनामुक्तीसाठी मार्गदर्शन करा, असे सांगितले.
👉‘आशा’ शब्दाला साजेस काम
आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला मिळालेल्या यशाचे तुम्ही शिलेदार आहात असे गौरवपूर्ण उद्गार काढतानाच राज्यातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण केले जात असून या सुविधांची आपण मुळं आहात ती मजबूत करण्याचं काम केले जात असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. आपल्याला जगवते ती आपल्यातली ‘आशा’ हा शब्द ज्याप्रकारे तयार झाला आहे त्याला साजेसं काम आशा ताई करीत आहेत. ते असेच कायम ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
👉संभाव्य तिसरी लाट रोखण्यात आशाताईंची महत्वाची भूमिका
मुख्यमंत्री म्हणाले, आशा, अंगणवाडी सेविका प्रशासनाचा पाठकणा असून स्वताची प्रकृती, कुटुंब याकडे लक्ष न देता ग्रामीण भागात आरोग्य सेवा देत आहात. त्यासाठी मी मानाचा मुजरा करतो. आशा, अंगणवाडी सेविकांच्या ज्या व्यथा, अपेक्षा आहेत त्याची योग्य ती दखल घेण्यात आली आहे. आपले ऋण विसणार नाही. आपल्या व्यथांवर मार्ग काढला जात आहे त्याला थोडा अवधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आशाताईंना केले. महाराष्ट्राच कुटुंब आपण तळ हाताच्या फोडासारखं जपत आला आहात तज्ञांच्या मतानुसार कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये जाणवणार असून ती रोखण्यासाठी आशा ताईंची भुमिका महत्वाची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी टास्क फोर्समधील डॉ. प्रभू, डॉ. येवले, डॉ. किणीकर, डॉ. दलवाई यांनी सोप्या भाषेत कोरोना प्रतिबंध व उपचार, लहान मुलांसाठी पौष्टीक आहार, मानसिक आजार याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मुरबाड येथील रोहीणी भोंदिवले, पातोंडा जि. नंदूरबार येथील साधना पिंपळे, भंडारा येथील भुमिका बंजारी, हिंगोली येथील सुनिता कुरवडे या आशा सेविकांनी मनोगत व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!