किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून टप्प्याटप्प्याने संवर्धन


👉गड किल्यांच्या संवर्धनासाठी राज्यातील दूर्गप्रेमी, गिर्यारोहकांनी
👉मुख्यमंत्री संकल्प कक्षास सूचना पाठविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

मुंबई : राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत असून राज्यातील दूर्ग प्रेमी, दूर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावे व कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील २५० दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहक यांच्याशी दुरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व त्यांच्या सुचना ऐकल्या. या बैठकीचे संचालन आदेश बांदेकर, मिलिंद गुणाजी यांनी केले तर अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, गिरीश टकले या प्रसिद्ध गिर्यारोहक व दूर्गप्रेमींनी आपले विचार सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मांडले.

👉ईमेलवर सूचना पाठवा
दूर्ग प्रेमीना दूर्ग संवर्धनाच्या दृष्टीने काही सुचना करावयाच्या असतील तर त्यांनी त्या cmsankalpkaksha@maharashtra.gov.in या मुख्यमंत्री सचिवालयाच्या संकल्प कक्षाला पाठविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ते म्हणाले की, दूर्ग संवर्धनात आपण आजपर्यंत केवळ अडीअडचणींचा पाढा वाचत होतो पण आता तसे होणार नाही. या अडचणींवर मार्ग काढून पुढे कसे जायचे ते या क्षेत्रातील तज्ञ मंडळीनी एकत्र बसून ठरवावे व किल्ल्यांच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा तयार करावा, राज्य शासन यामध्ये पूर्ण सहकार्य करेल.

👉गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपा
गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता आपल्याला हे काम करावयाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी परत एकदा स्पष्ट केले.गड किल्याचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याचा आपला विचार असून हळूहळू यात इतर किल्ल्यांचाही समावेश करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड या किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे नियोजन असून दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करून सर्वांच्या सूचनांचा विचाराने आराखडा तयार करायला लागा असेही मुख्यमंत्री म्हणाले. गड किल्ल्यांचे संवर्धन करणार म्हणजे नक्की काय करणार आणि त्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून ते कसे करायचे त्याचा पहिले सविस्तर विचार करा. जगभरात शिवरायांच्या या गड किल्ल्यांची महती पोहचेल यासाठी उत्तमोत्तम आणि दर्जेदार छायाचित्रे, ड्रोनसारख्या साधनांचा उपयोग करून केलेल्या व्हिडीओ क्लिप्स विविध माध्यमांतून जगभर पोहचेल असे पाहिले पाहिजे. गड किल्यांच्या पायथ्याशी परिसरात त्या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती देणारे केंद्र किंवा संग्रहालय उभारणे, केंद्र व राज्याकडील किल्ल्यांची वर्गवारीनुसार संवर्धनाचे नियोजन करणे, किल्यांच्या परिसरातील जैवविविधता, निसर्ग, प्राणी- पक्षी यांची देखील जपणूक तितकीच महत्वाची असून त्याविषयीही पर्यटक आणि संशोधक यांना आकर्षक स्वरूपात उपयुक्त माहिती मिळणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी दूर्गप्रेमींनी आपल्या सूचना मांडतांना दुर्गांचे राज्य सरकारने अधिग्रहण करावे, पर्यटन, पुरातत्व, वन विभाग यांच्यात अधिक समन्वय असावा, दुर्ग संवर्धन खाते सुरु करावे, दुर्गांसाठी सहाय्यता निधी सुरु करावा अशा अनेक सूचना केल्या
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींचीहि उपस्थिती होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!