ऑक्सीजन निर्मिती आणि पुरवठ्याबाबतच्या सुविधा निर्मितीसाठी पाठपुरावा आवश्यक :निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प अथवा ऑक्सीजन साठवणूक क्षमता निर्माण करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने तालुका यंत्रणांनी या सुविधा निर्मितीसाठी आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिल्या.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात आता जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्याचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. निचित यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.

यावेळी श्री. निचित म्हणाले, सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन संभाव्य लाटेच्या अनुषंगाने आवश्यक ऑक्सीजनसाठी कार्यवाही करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी यापूर्वीच निर्देश दिले आहेत. जी हॉस्पिटल्स ५० पेक्षा जास्त बेडस क्षमतेची आहे, त्यांनी त्यांना आवश्यक असणारा ऑक्सीजन साठवण्यासाठीची व्यवस्था कऱणे, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी, जम्बो सिलींडर, ड्युरा सिलींडरची व्यवस्था आदींची सुविधा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांबरोबर करार करुन घेणे आवश्यक आहे. तालुका पातळीवर ही कार्यवाही वेगाने होणे अपेक्षित आहे. प्रत्येक हॉस्पिटल्सने किमान तीन दिवस पुरेल एवढा ऑक्सीजन साठा राखीव ठेवणे बंधनकारक असणार आहे. तालुका यंत्रणांनी यासंदर्भात स्थानिक इंडियन मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या बरोबर समन्वय ठेवावा. हॉस्पिटल्सने ऑक्सीजन संदर्भात स्वावलंबी व्हावे यासाठी यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ते पावले उचलावीत. त्यासाठी आतापासूनच तयारी कऱणे अभिप्रेत आहे. ज्या हॉस्पिटल्सची ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणी क्षमता नाही, अशा छोट्या हॉस्पिटल्सने एकत्र येत लिक्विड मेडीकल ऑक्सीजन साठी साठवणूकीची क्षमता निर्माण करणे आणि ऑक्सीजन मिळण्यासाठी संबंधित कंपन्यांबरोबर करार करणे आवश्यक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने वेळेचा अपव्यय उपयोगाचा नसल्याचे त्यांनी नमूद केले.
कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. तालुका यंत्रणांकडून याबाबत ज्या गतीने कार्यवाही आवश्यक आहे, तशी होताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कार्यवाही आवश्यक आहे. तसेच, लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,900SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!