फोडाफोडीच्या राजकारणाने मतदारांच्या मताला काहीच किंमत नाही : गजेंद्र राशिनकर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – गेल्या काही दिवसांत राज्यातील घडामोडींमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आपण ज्यांना मतदान केले, तेच विरोधकांना सामिल झाले तसेच ज्यांनी युती – आघाडी करुन मते घेतली त्यांनीही फुटून सत्तेसाठी दुसर्यांशी घरोबा केला. सत्तेसाठी पक्ष बदल, फोडाफाडीच्या राजकारणाने सामान्यांच्या मताला काहीच किंमत राहिली नाही, असेच म्हणावे लागेल. सत्तेसाठी मतदारांच्या भावनांशी खेळाणार्या या दलबदलू राजकारण्यांविषयी सर्वसामान्यांच्या मनात जो संताप निर्माण झाला आहे, त्याला वाट करुन देण्यासाठी व नागरिकांचा संताप व्यक्त करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘एक सही संतापाची’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विविध पक्षातील कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत सही करुन आपला संताप व्यक्त करत दलबलूंना जाब विचारला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे ‘एक सही संतापाची’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, शहर सचिव संतोष साळवे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, इंजि. विनोद काकडे, शहर उपाध्यक्ष संकेत व्यवहारे, तुषार हिरवे, गणेश शिंदे, महेश चव्हाण, प्रकाश गायकवाड, प्रमोद ठाकूर, अशोक दातरंगे, बाबासाहेब होळकर, चंद्रकांत ढवळे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सचिन डफळ म्हणाले, आज राज्यात जी उलथापालथ सुरु आहे, सत्तेसाठी मतदारांनी दिलेला मतदानाचा अनादर करत सहभागी झाले आहेत, नित्तीमत्ता सोडून सत्तेसाठी हपापलेल्या पक्षाशी संधान साधले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एक संतापाची लाट निर्माण झाली आहे. मतदारांचा हा संताप मनसेने ‘एक सही संतापाची’ मोहिमेद्वारे उघड केला आहे. पक्षांची ध्येय, धोरणे विसरुन सत्तेसाठी काहीपण करणार्या पुढार्या विरोधात मतदारांच्या एका सहीच्या रुपाने भावना व्यक्त केल्या आहेत. नागरिकांच्या या संतापातून देव त्यांना सद्बुद्धी देवो, हीच अपेक्षा असल्याचे सांगितले.
दिल्लीगेट येथे सुरु असलेल्या या अभियानांत नागरिक, विद्यार्थी, महिलांनही सहभागी होत मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करुन सही करत होते.