वधुवर मेळाव्यात क्रांतिकारी ठराव ! वाढीभाऊ प्रथेला मूठमाती !
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी – लग्न जमत नसल्याने तरुण पिढी निराशेच्या गर्तेत ढकलत चालली असून यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने बेटी पढाव बेटी बचाव ही संकल्पना राबवत आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे अशी अपेक्षा विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांनी व्यक्त केली.
विठोबाराजे मंगल कार्यालयात क्षत्रिय वंजारी एकता परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या वधु वर सूचक मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वंजारी समाजात असलेल्या वाढी भाऊ या प्रथेला मूठमाती देण्याचा महत्वपूर्ण ठराव मांडून तो सर्व समाजबांधवांच्या साक्षीने मंजूर करण्यात आला उपस्थितांनी हात उंचावून व टाळ्या वाजवून या निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे, अर्जुन शिरसाठ, दादा मुंढे, संभाजी पालवे, आजिनाथ महाराज आंधळे, भगवान आव्हाड, माणिक खेडकर, गोकुळ दौन्ड, भगवान दराडे, गहिनीनाथ शिरसाठ,डॉ.मृत्युंजय गर्जे, वैभव आंधळे,धनंजय बडे,बजरंग घोडके,अॅड.हरिहर गर्जे,अॅड.रामदास भताने, अॅड.संपत गर्जे, अशोक गर्जे,गोकुळ दौंड,अमोल गर्जे,नारायण पालवे, राजेंद्र दौन्ड,विष्णुपंत ढाकणे,नारायण पालवे,सुभाष केकाण, देविदास खेडकर, दिनकर पालवे, अरुण खाडे, राहुल कारखेले, अॅड.सतीश पालवे, वसंत खेडकर, महेंद्र शिरसाठ यांच्यासह वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मेळाव्यास तेलंगणा राज्यातील शिवाजी मुंडे यांनी हजेरी लावली.
या वेळी बोलताना खेडकर म्हणाले की, आपला तालुका हा ऊसतोड मजुरांचा तालुका असून शेतीसाठी शाश्वत पाणी नसल्याने उसतोडण्यासाठी आपल्याला जावे लागते. ऊसतोड मजुरांच्या मागचे हे ग्रहण कायमस्वरूपी मिटण्यासाठी गोदावरी खोऱ्याचे वाढीव पाणी आपल्याला मिळण्यासाठी सर्वानीच एकदिलाने काम करायला हवे.मी सुद्धा ऊसतोड मजुरांचा मुलगा असल्याने मला मजुरांच्या कष्टाची जाण असून येथून पुढील काळात आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून काम करणार आहोत.पुढील महिन्यात सुशिक्षित बेरोजगा युवकांचा मेळावा घेऊन या मेळाव्यात अनेक कंपन्यांना मी बोलावणार असून त्या मुळे तरुणाच्या हाताला काम मिळणार आहे.शेतीवर आधारित दोन प्रकल्प मी लवकरच सुरु करणार असून या प्रकल्पाचा फायदा हा शेतकऱ्यांना होणार आहे. व्यावसायिक कार्यशाळा घेत तरुणांना उद्योग सुरु करून देण्याचाही आपला प्रयत्न आहे. समाजात अनेक अडचणी असून त्या सोडवण्यासाठी समाजातील उच्चपदस्थ अधिकारी,राजकीय नेते यांनी प्रयत्न करावे अशी अपेक्षा शेवटी खेडकर यांनी व्यक्त केली.
वंजारी समाजात असलेल्या वाढीभाव प्रथेमुळे अनेक कुटुंबाला मुलगा किंवा मुलगी पसंद असूनही नातेसंबंध होत नसल्याने या समाजात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र आजच्या मेळाव्यात वाढीभाव प्रथेला मूठमाती देण्याचा ठराव मंजूर करून घेण्यात आल्याने वंजारी समाज बांधवांकडून या निर्णयाचे मोठे स्वागत करण्यात आले.