संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाले आहे. महिन्याभरापूर्वी अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी महायुतीत सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 30 ते 32 आमदारही गेले आहेत. शरद पवार यांचीच ही खेळी असल्याचा आरोप होत आहे. या सर्व आरोपांना शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या सोशल मीडिया कार्यशाळेच्या कार्यक्रमात एक प्रकारे उत्तर दिले आहे. भाजपसोबत गेलेल्यांनी पक्ष फोडला नसून त्यांनी पक्षांतर केले असल्याचं सांगत पवारांनी, राजकारणामध्ये सत्याची कास सोडून, कोणी दमदाटी करत आहे म्हणून भूमिका बदलणार्या भेकड प्रवृत्तीला सामान्य लोक त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहाणार नाही. असा इशारा दिला आहे.
महायुतीत सहभागी होत अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री झाले आहेत. तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे आठ आमदारही मंत्री झाले आहेत. या सर्वांना तुरुंगात जाण्याची भीती होती, त्यामुळे या भेकड प्रवृत्ती भाजपच्या दावणीला जाऊन बसल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना ईडीच्या कारवाईची भीती होती. त्यामुळे त्यांनी भूमिका बदलली आहे. ते कारवाईला सामोरे जाण्यास घाबरत होते, असेही पवारांनी म्हटले आहे. माजी गृहमंत्री आणि काटोलचे आमदार अनिल देशमुख आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा उल्लेख करुन पवार म्हणाले, अनिल देशमुखांवरही भूमिका बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. मात्र त्यांनी सत्याची कास सोडली नाही आणि 14 महिने तुरुंगवास भोगला. तिच परिस्थिती दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावरही आली. मात्र या दोघांनीही भूमिका बदलली नाही, असे पवार म्हणाले.
भाजपसोबत गेलेले नेते आजही स्वतःला राष्ट्रवादीचेच म्हणवून घेत आहे, त्यांचाही समाचार पवारांनी घेतला. ते म्हणाले, सोडून गेलेले लोक आजही सांगत आहेत की आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत. आम्ही भूमिका बदललेली नाही. पण इकडे (शरद पवारांसोबत) राहिलो असतो तर तुरुंगात जावे लागले असते. या भीतीनेच ते भाजपच्या बाजूने बसले आहेत आणि भाजप नेते सांगतील तेच त्यांना बोलावे लागत आहे. ते सांगतिल तसेच निर्णय घ्यावे लागत आहेत. अशा भेकड प्रवृत्तींना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहाणार नाही, असा इशाराही पवारांनी दिला.
अलीकडच्या काळात काही बदल झाले. पक्षातील काही सहकार्यांनी पक्षांतर केलं. त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही विकासासाठी गेलो. असं म्हणण्यात काही अर्थ नाही. जे कोणी लोक आज गेले, त्यातील बहुतेक लोकांवर केंद्र सरकारने ईडीची चौकशी सुरु केली. ईडीची चौकशी सुरु झाल्यानंतर आपले काही सहकारी या परिस्थितीला सामोरं जायला तयार नव्हते. काही होते, अनिल देशमुख 14 महिने तुरुंगात होते. त्यांनाही सांगितलं होतं. तुम्ही बदल करा. तुम्ही तिकडून इकडे या. त्यांनी स्वच्छ सांगितलं. मी कुठलीही चूक केलेली नाही. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. आणि असं असताना माझ्यावर दबाव आणून माझी वैचारिक भूमिका मी सोडावी, असं तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा, मी ते करणार नाही. आणि अनिल देशमुख 14 महिने तुरुंगात गेले. आज सामनाफचे संपादक यांचीही हीच अवस्था आहे.
ज्यांनी पक्षांतर केलं. पक्षांतर केलं म्हणजे काय केल. आम्ही आता भाजपच्या दावणीला जाऊन बसलो. त्यांना आज कुठलाही प्रश्न आला की भाजपच्या बाजूने बोलावं लागतं. भाजपच्या बाजूनं मतदान करावं लागतं. त्यांना एवढंच सांगतलंय तुमच्यावर ज्या काही केसेस आहेत, त्यावर आम्ही अधिक काही करत नाही. तुम्ही बाजू बदला. नाही बदलली तर तुमची जागा दुसरी. त्यामुळे त्या दुसर्या जागेत तुम्हाला पाठवू. त्या दुसर्या जागेच्या भीतीला तोंड देण्याची त्यांची तयारी नाही. त्या प्रकारच्या लोकांवर अशा प्रकारची कारवाई केली गेली. कारवाईची स्थिती बघून आपल्या काही सहकार्यांनी रस्ता बदलला आणि आज ते भाजपच्या बाजूने जाऊन बसले. ते सांगताना सांगतात, आम्ही राष्ट्रवादीचे आहोत. आमची वैचारिक भूमिका बदललेली नाही. फक्त तिकडनं आत जावं लागले. ते आत जावं लागू नये म्हणून आम्ही आजचा निकाल घेतला. आजच्याच वर्तमान पत्रात अशाच प्रकारची भूमिका कोणाचीतरी आलेली आहे. त्याचा अर्थ हा आहे, की राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सत्याची कास सोडून, कोणीतरी दमदाटी देत असले, त्या रस्त्याने जायचं हा निकाल तुम्ही घेतला असले, तर माझी खात्री आहे, आज ना उद्या अशा भेकड प्रवृत्तीला सामान्य लोक वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहाणार नाही. त्यांची अडचण झाल्याशिवाय राहाणार नाही.
–