संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबईः एक आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल. त्यामुळे काळजी करू नका, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा शपथविधी झाला. तुमचे आमदार नाराज आहेत, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आला. तुम्हाला कोणी फोन केला होता का? की आमदार नाराज आहेत. कोणी नाराज नाही, असे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मग तुमचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. तातडीने एक आठवड्यात आमचाही मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी विकास मान्य केला आहे म्हणून ते आमच्या सोबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशाचा आणि राज्याचा विकास सुरु आहे. त्यामुळेच तर अजित पवार हे आमच्या सोबत आले आहेत. आणि आता मी मुख्यमंत्री आहे. काळजी करु नका, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. अजित पवार यांच्यावर आरोप करुन तुम्ही सत्तेतून बाहेर पडलात. आता ते पुन्हा तुमच्या सोबत आहेत. आता तुमची काय प्रतिक्रिया आहे, या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हे उत्तर दिले.
ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का, शिशिर शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश
दोन दिवसांपूर्वी मुंबईत ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे समर्थक समजले जाणारे राहुल कनाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर सोमवारी दुपारी उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. याशिवाय ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांचे निकटवर्ती समजले जाणारे संपर्क प्रमुख विलास पारकर यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा जाहीर पक्षप्रवेश सोहळा ठाण्यातील आनंद आश्रम येथे पार पडला. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला गळती लागल्याचे दिसत आहेत.