अवैधरित्या वर्गणी मागणार्यांची तक्रार द्या!
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : सण-उत्सवांच्या नावाखाली अवैधरित्या वर्गणी गोळा करून व्यापार्यांना त्रास देणार्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. ते कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील जुना बाजार येथील औषध विक्रेते आणि एजन्सी यांच्या बैठकीत बोलत होते. जबरदस्तीने वर्गणी गोळा करण्यासाठी कोणी तगादा लावल्यास, अशांची तक्रार कोतवाली पोलिस ठाण्यात करण्याचे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.
शहरातील जुना बाजार, कापड बाजार, बुरूड गल्ली भागात व्यवसाय करणार्या व्यापार्यांना त्रास देवून काही गुंड प्रवृत्तीचे लोक पैशांची मागणी करत असल्याची तक्रार व्यापारी वर्गाने पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली होती. विविध सण-उत्सवाच्या नावाखाली काही ठरावीक व्यक्ती कोणतीही पावती न देता वर्गणी गोळा करत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. व्यापारी वर्गाकडे अशाप्रकारे वर्गणीची मागणी करून त्रास देणार्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जबरदस्तीने वर्गणीसाठी कोणी त्रास दिल्यास संबंधितांची तक्रार कोतवाली पोलिसांकडे करण्याचे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे. व्यापार्यांकडे वा इतर कोणाहीकडे जबरदस्तीने वर्गणी मागणार्यांची तक्रार आल्यास खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा कोतवाली पोलिसांनी दिला आहे.
यासोबतच ऑनलाईन फसवणूक, ट्रॅफिक अडचण, मुलींच्या छेडछाडी संदर्भातला अडचणी अशा विविध विषयावर चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष दत्ता गाडळकर, भरत सुपेकर ,मनीष सोमानी, अमित घाडगे ,आशुतोष कुकडे , हेमंत गुगळे, अमित धोका, नितीन मनोज, सुनील सुरवसे असे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
विनाकारण त्रास देणार्यांची खैर नाही
समज देवून गुन्हे करणार्यांवर कोतवाली पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देणार्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा कोतवाली पोलिसांनी दिला आहे.