95 इसमांवर नगर तालुक्यात प्रवेश बंदीची कारवाई, तर 25 लोकांना सदर कालावधीत चांगल्या वर्तणुकीचे बॉण्ड घेण्यासाठी प्रतिबंधक कारवाई, 30 लोकांना नोटीस असा 150 लोकांवर प्रतिबंध कारवाई.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरात गुरुवारी (दि.30) रामनवमीनिमित्त शोभा यात्रा मिरवणूक निघणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून मिरवणूक मार्गावर 25 ठिकाणी 55 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. तसेच 30 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, 95 इसम यांना नगर तालुक्यात प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आल्याची माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
श्रीरामनवमी शोभा यात्रेची मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होणार आहे. मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. मिरवणूक मार्गावर तब्बल 55 पेक्षा जास्त सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी मिरवणुकीत लाईट गेल्यास मिरवणूक मार्गात लाईटची व्यवस्था देखील करण्यात आली असून मिरवणूक मार्गात असलेले इलेक्ट्रिक पोल सुद्धा महावितरण कंपनीच्या मदतीने बाजूला करण्यात आलेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच साजरी होणारी रामनमवी उत्साहात पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी केली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या उपस्थितीत अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आणि शहरातील संघटनांचे ट्रस्टी यांच्यासोबत बैठक पार पडली. रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य खबरदारी घेतली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नव्याने रुजू झालेले कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी खबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक कारवाया करत मिरवणूक मार्गावर चोख बंदोबस्त देखील ठेवला आहे.
तर वाहनांवर होणार कारवाई –
मिरवणूक मार्गावर होणार्या गर्दीमुळे पंचपीरचावडी ते चाँदसुलताना हायस्कुल या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी न करण्याच्या सूचना पोलिसांनी परिसरातील नागरिकांना केल्या आहेत. मिरवणुकीवेळी वाहने रस्त्यावर उभी केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.
असा असणार पोलिस बंदोबस्त-
पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक (2), पोलिस निरीक्षक (8), सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक (25), पोलिस अंमलदार (330), एक आरसीपी प्लाटून, एक एसआरपीएफ प्लाटून असा तगडा पोलिस बंदोबस्त रामनवमी शोभायात्रेदरम्यान तैणात असणार आहे.