सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : पाथर्डी शहरातील सराफ बंडूशेठ चिंतामणी यांच्यावर शेवगाव रोडवर खुनी हल्ला करून हल्लेखोरांनी त्यांच्याजवळील सोन्याच्या दागिन्यांची बॅग पळून नेण्याची घटना गुरुवारी (दि.२३) सायंकाळी घडल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. पाथर्डी शहरासह तालुक्यातील व्यापा-यांकडून या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात येणार आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते प्रतापकाका ढाकणे यांनी रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी शहरातील नवीपेठेतील सोन्या-चांदीचे व्यापारी सराफ बंडूशेठ चिंतामणी हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून अर्जुना लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या राहत्या घरी जात होते. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्यावर शेवगाव रोडवर खुनी हल्ला करून सोन्याची दागिने असलेली बॅग पळविल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चिंतामणी हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शहरात सुवर्ण व्यापारी चिंतामणी यांच्यावर झालेल्या प्राण घातक हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या शुक्रवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सर्व पक्षीय पाथर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. शुक्रवारी (दि२४) सकाळी नवीपेठ येथील सुवर्णसिद्धी गणेश मंदिरापासून सकाळी १० वाजता मोर्चा निघणार आहे