संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर- भिंगार ते फुंदेटाकळी (कल्याण निर्मल नांदेड ६१) आणि अहमदनगर- मनमाड, अहमदनगर- सोलापूर या तिन्ही मोठ्या राष्ट्रीय महामार्गाची गेली ७ वर्षापासून मोठी दयनीय अवस्था झाली आहे. असे असताना संबधित लोकप्रतिनिधी व महामार्ग प्रशासन हे काम पूर्ण होण्याबाबत काहीच कार्यवाही करत नाही. या महामार्गाचे काम तातडीने मार्गी लागावे, यासाठी येत्या दि.७ डिसेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन आ.निलेश लंके यांच्यासह पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिले आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या ३ राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम सार्वजनिक बांधकाम व राष्ट्रिय महामार्ग कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही हे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने लोकप्रतिनिधी व सामाजिक जबाबदारी या नात्याने येत्या दि. ७ डिसेंबरपासून सर्वसामान्य जनता, सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन आमदार निलेश लंके व सामाजिक कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले.या वेळी आमदार रोहित पवार, क्षितीज घुले, शिवशंकर राजळे, घनश्याम शेलार, रफीक शेख, बंडू बोरूडे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. हरिहर गर्जे, राजेंद्र दौंड, चांद मनियार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी भोसले यांना सांगितले की, मनमाड, पाथर्डी व सोलापूर या तिन्ही रस्त्यांच्या कामाबाबात मी स्वतः गेल्या दोन अडीच वर्षापासून काम पूर्ण होण्याबाबत पाठपुरावा करत आहे. संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र याची दखल घेतली नाही, ही बाब अतिशय खेदजनक आहे. अहमदनगर- पाथर्डी- नांदेड या निर्मल रस्त्याचे काम गेल्या ७ वर्षापासून रखडलेले आहे. रस्ता शेवगाव, पाथर्डी या मुख्यालायासह राज्यभरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र मोहटादेवी, श्री.क्षेत्र कानिफनाथगड, पैठण येथे जाणारा मुख्य रस्ता आहे. याबाबत संबधित विभागाचे अधिकारी गंभीर नसून ते या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत.
मनमाड रस्ता हा राहुरी, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता ही तालुके अहमदनगरला जोडणारा मुख्य रस्ता आहे. सोलापूर रस्त्यावरील मिरजगाव, कर्जत, करमाळा, राशीन, टेंभूर्णी असा पुणे- सोलापूर रस्त्यास मिळतो. उत्तर महाराष्ट्रातील, खान्देश, मराठवाड्यातील वारीला जाणारे जाणारे भाविक या रस्त्याच्या पालखी मार्गाने पंढरपूरकडे जात असतात. शिवाय या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुकही सुरू असते. यामुळे होणाऱ्या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याबाबत आजपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही लोक प्रतिनिधीने गांभिर्यापूर्वक दखल घेतलेली नाही. मी सामान्य नागरिकांचा लोकप्रतीनिधी या नात्याने काहीच कार्यवाही करू शकलो नाही, याची मला खंत वाटते. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करूनही अद्याप काहीच कार्यवाही होत नसल्याने निवेदन दिल्यापासून ७ दिवसांनी बुधवार दि.७ डिसेंबरला सामान्य जनतेसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार असल्याचे या निवेदनात आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.
“राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबधित अभियंते,या कामाचे ठेकेदार तसेच सल्लागार समिती यांच्यावर या रखडलेल्या महामार्गामुळे होणा-या अपघाताची जबाबदारी निश्चित करून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. हरिहर गर्जे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.