Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर- शासकीय रूग्णालयाला औषधे व वैद्यकिय उपकरणांचा पुरवठा करण्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून औषध एजन्सी चालकास ३१ लाखांना चौघांनी फसवल्याचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. विजय ढेरे (रा. लोहगाव, ता. नेवासे), सचिन गुलदगड (रा. गुलदगडमळा, राहुरी), पुष्पक महालकर (रा. धावडे, पुणे), कांचन बराई (रा. धावडे, पुणे) या चौघांवर गुरूवारी (दि.२४) गुन्हा दाखल आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, गणेश राजमल फिरोदिया (वय ३१, रा. शिवगंगा टॉवर्स, सारसनगर, अहमदनगर. मूळ रा. दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांचे शहरातील जुना बाजार भागात सिटीप्राईड गेस्ट हाऊसमध्ये श्री गणेश एजन्सी नावाचे औषधे विक्रीचे दुकान आहे. प्रकाश दरेकर (रा. निंबळक, ता. नगर) यांचे युवराज फार्मा हे दुकान आहे. व्यावसायाच्या निमित्ताने त्याच्याशी ओळख झाली होती. दरेकर याने दि.३१ ऑगस्ट २०१९ रोजी फोन करून सांगितले की, औरंगाबाद घाटी रूग्णालयामध्ये औषधे आणि वैद्यकीय उपकरणाची मोठी ऑर्डर आहे. डी.के.टी. फार्माचे रिझनल मॅनेजर विजय साहेबराव ढेरे व अतुल गवळी हे आपल्याला ऑर्डर मिळवून देतील, असे सांगण्यात आले. त्यानुसार ढेरे यांच्यासह या व्यवहाराच्या निमित्ताने अहमदनगरला एका हॉटेलमध्ये बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे डी. के.टी. कंपनीचा माल पुणे येथील युनिव्हर्सल ॲण्ड तपाडिया एजन्सीमधून दि.१३ सप्टेंबर ते दि.१६ऑक्टोंबर २०१९ या कालावधीत वेळोवेळी ३१ लाख ५७ हजार ६८९ रूपयांची औषधे व वैद्यकीय उपकरणे खरेदी केले. ढेरे यांनी घाटी रूग्णालयासाठी माल खरेदी केला नाही. घाटी रूग्णालयात जाऊन प्रत्यक्ष खात्री केली असता, अशा स्वरूपाची औषधे व उपकरणांची आवश्यकता नसल्याचे समजले.
ढेरे याने हा माल खरेदी करण्यासाठी दुसरी पार्टी तयार असल्याचे सांगून सचिन भाऊसाहेब गुलदगड (रा. सुलक्ष्मी निवास, तनपुरेवाडी रस्ता, राहुरी), पुष्पक एल महालकर (रा.धावडे, पुणे), कांचन बराई (रा. लक्ष्मी पार्क, कोंडवे, धावडे, पुणे) यांच्याशी ओळख करून दिली. त्यानुसार दि.६ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना ३१ लाख ५७ हजार ६८९ रूपयांची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे दिली. त्याबदल्यात दिलेला धनादेश बँकेत पुरेशी रक्कम नसल्याने वटला नाही. त्यांच्याबरोबर बिलाबद्दल अनेकदा संपर्क केल्यानंतर भावाने आत्महत्या केली, बाहेरगावी, जीएसटीमुळे अडचण आहे, अशी विविध कारणे सांगून रक्कम देण्यास टाळली. यानंतर ३१ लाख रूपये देणार नसल्याचे सांगू लागले. विजय ढेरे (रा. लोहगाव, ता. नेवासे), सचिन गुलदगड (रा. गुलदगडमळा, राहुरी), पुष्पक महालकर (रा. धावडे, पुणे), कांचन बराई (रा. धावडे, पुणे) या चौघांनी संगनमत करून कट कारस्थान रचून ३१ लाख ५७ हजार ६८९ रूपयांची फसवणूक केल्याने त्यांच्याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पुढील तपास करीत आहेत.