वाचनाची सवय पुढच्या पिढीपर्यंत पोहोचून संस्कारक्षम व विचारसंपन्न पिढी निर्माण व्हावी : खा. डॉ. सुजय विखे पा.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :-
वाचनामुळे आकलनशक्ती वृद्धींगत होऊन विचारांना स्थैर्यता प्राप्त होण्याबरोबरच व्यक्तीमत्वाची जडणघडण अधिक चांगल्या प्रमाणात होते. तरुण पिढीला डिजिटल स्वरुपात ग्रंथ उपलब्ध करुन देत वाचनाची सवय पुढच्या पिढीपर्यंत पोहोचून यातून संस्कारक्षम व विचारसंपन्न पिढी निर्माण व्हावी, अशी अपेक्षा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.
पेमराज सारडा महाविद्यालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अहमदगनर “ग्रंथोत्सव 2022” चा शुभारंभ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी आमदार पांडूरंग अभंग, डी.बी. देशमुख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर,डॉ. अजित फुंदे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे, ॲङ आबासाहेब देसाई, किशोर मरकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, आजच्या आधुनिकतेच्या युगात तरुण पिढीमध्ये वाचनाची सवय कमी होत चालली आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून जोपासल्या जाणाऱ्या वाचनसंस्कृतीचे कौतुक करत वाचनाची ही सवय संरक्षितपणे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. आजघडीला तरुण पिढी समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करते. देशाला दिशा देणाऱ्या थोरामोठ्यांचे आत्मचरित्र तसेच ग्रंथ डिजिटल स्वरुपामध्ये या तरुण पिढीला उपलब्ध करुन दिले पाहिजेत. यामुळे तरुण पिढीला वाचनाची सवय लागून यातून एक विचारसंपन्न पिढी तयार होण्यास मदत होईल.
वाचन संस्कृती टिकविण्यामध्ये मोलाची भूमिका असलेल्या जिल्हा ग्रंथालयाला स्वत:ची इमारत नाही. अहमदनगर जिल्ह्याच्या वैभवात भर पडेल अशा पद्धतीने सर्व सुविधांनीयुक्त व सुसज्ज जिल्हा ग्रंथालयाच्या इमारतीसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देत येणाऱ्या काळात ही इमारत शहरामध्ये उभी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माजी आमदार पांडूरंग अभंग म्हणाले की, समाजमाध्यमांकडे आजच्या तरुण पिढीचा ओढा आहे. त्यामुळे वाचन संस्कृती कमी होत चालली असल्याचे चित्र दिसत आहे. देशाला व राज्याला अनेकविध संत-महंतांचा मोठा वारसा लाभलेला असुन थोरा-मोठ्यांचे आत्मचरित्राचे प्रत्येकाने वाचन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर म्हणाले, वाचन संस्कृती वाढावी, टिकावी तसेच ग्रंथप्रेमींना एकाच छताखाली विविध ग्रंथ मिळून त्यांच्या वाचनाची भुख भागावी या उद्देशाने ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय या ग्रंथोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाबरोबरच विविध प्रकाशनांच्या पुस्तकांच्या स्टॉलचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. अहमदनगर वासियांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहनही श्री गाडेकर यांनी यावेळी केले.
सर्वप्रथम आधुनिक भारताच्या ग्रंथालय शास्त्राचे जनक एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेच्या पुजनाने व फित कापून या ग्रंथोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये केंद्र शासनाचा जलनायक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राहुरीचे शिवाजी घाडगे यांच्यासह उत्कृष्ट ग्रंथवाचक म्हणून उपजिल्हाधिकारी जितेंद्र पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी गजानन नकासकर, पत्रकार भूषण देशमुख, वर्षा गोरकर, अंबादास गाजूल, संजय आहेर, गणेश नरोटे, विश्वनाथ जोशी, राजेश धवन यांच्यासह ईतर वाचकांचा मान्यवरांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. गणेश भगत यांनी केले तर आभार शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस यांनी मानले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह ग्रंथप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तत्पूर्वी सकाळी करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक (हुतात्मा स्मारक) येथे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते ग्रंथदिंडींचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी न्यू आर्टस महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना दारकुंड, सुभाष गोरे, संजय पाठक, जिल्हा वाचनालयाचे दिलीप पांढरे, श्रीमती कुलकर्णी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांची उपस्थिती होती.
करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथून या ग्रंथदिंडीची सुरुवात होऊन लालटाकीरोड ते पेमराज सारडा महाविद्यालय येथे सांगता करण्यात आली. या ग्रंथदिंडीमध्ये न्यू आर्टस महाविद्यालय, रेसिडेन्शिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पेमराज महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.