संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर ः वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनीने देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी, सदस्या चारू डोंगरे आणि महेश ढाके यांनी दिला आहे.
विष्णू बाबासाहेब ढाकणे (रा. टाकळी मानूर, ता. पाथर्डी) यांनी स्विफ्ट डिझायर (एमएम १६ एटी ६१३९) या वाहनाचा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा विमा घेतला होता. त्यांच्या वाहनास पुण्यावरून पाथर्डीकडे जाताना ता.३ जानेवारी २०१६ रोजी दगडवाडी फाट्याजवळ ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. वाहन खड्ड्यात पलटी होऊन वाहनाचे नुकसान झाले. त्यांनी विमा कंपनीशी संपर्क साधला. विमा कंपनीच्या सर्व्हेअरने वाहनाचे परीक्षण केले. परंतु, विमा रक्कम मिळाली नाही. त्यामुळे ढाकणे यांनी वाहन दुरूस्त करून विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर केला. कंपनीने ही रक्कम मंजूर केली नाही. ढाकणे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाकडे तक्रारअर्ज दाखल केला. विमा कंपनीने हे प्रकरण लवादाकडे पाठविण्याची भूमिका घेतली. ॲड. सुनील मुंदडा यांनी विमा दावा नाकारणे हे अयोग्य असल्याचे म्हणणे सादर केले. आयोगाने हे म्हणणे ग्राह्य धरून वाहन दुरूस्तीचा खर्च एक लाख ४० हजार, त्यावर ९ टक्के दराने व्याज, शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल १० हजार, तक्रारअर्ज खर्चापोटी ५ हजार रूपये ३० दिवसात देण्याचा आदेश दिला. ॲड. मुंदडा यांना ॲड. किर्ती करांडे, ॲड. सलोनी मुंदडा यांनी सहाय्य केले.