संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बीड – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळ्यावरही पंकजा यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या यांचे मेळावे म्हणजे राजकीय चिखलफेक आहे. पण आपला मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही तर चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. चिखल तुडवण, संघर्ष करणं आमच्या रक्तातच. संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. छत्रपतींनाही संघर्ष करावा लागला. संघर्षाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. पण मी थकणार नाही आणि कुणासमोर झुकणारही नाही असा इशाराच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बुधवारी (दि.५) दिला. दसऱ्यानिमित्त भगवानबाबा यांच्या सुपा सावरगाव (जि.बीड) या जन्मस्थळी आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी कधीही कोणावर टीका केली नाही किंवा संधीचा फायदा घेतला नाही. मी स्व मुंडे साहेब यांच्या स्वाभिमानी बाण्याचे अनुकरण नेहमी करत असते. पंडित दीनदयाळ,अटलजी यांच्या मार्गाने मी जाण्याचे काम करत आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मुशीतून आले आहेत, त्याच मुशीतून मीही घडले आहे. त्यांच्या व अमित शहा यांच्या आदेशाने देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मी काम करत रहाणार आहे , त्यामुळे मिळेल ती संधीचे सोने करेन, परंतु काही मिळाले नाही तरी कोणापुढे हात पसरणार नाही. यापुढे आपले लक्ष्य फक्त 2024 च्या निवडणुकीवर असणार आहे. त्यामुळे सर्व चर्चा थांबून कामाला सुरुवात करावी, असे आवाहन यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले. संघर्ष कोणालाही चुकलेला नाही, स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या ४० वर्षाच्या राजकारणात साडेचार वर्ष सत्तेची सोडली तर बाकीचे वर्ष संघर्ष होता. त्यापुढे माझा संघर्ष काहीच नसल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी रासपचे सर्वेसर्वा व माजी मंत्री महादेव जानकर व मा. आ. भीमराव धोंडे यांनी पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी मंत्री शिवाजी कर्डीले, खा. सुजय विखे पा, खा. प्रितम मुंडे, आ.मोनिका राजळे, आ.मेघना बोर्डीकर, आ.सुरेश धस, आ.नलिनीताई, यशश्री मुंडे, आ.बाळासाहेब मुरकुटे, आ.भीमराव धोंडे, भाजप नगर जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र म्हस्के, हभप.राधाताई सानप, राम कुलकर्णी, गोविंद केंद्रे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
संकलन : सोमराज बडे